वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेली हॉस्पिटल्स सुपर स्पेशलिटी करण्यासाठी प्रयत्नशील; हसन मुश्रीफ यांची ग्वाही

वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेली हॉस्पिटल्स सुपर स्पेशलिटी करण्यासाठी प्रयत्नशील; हसन मुश्रीफ यांची ग्वाही

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व हॉस्पिटल्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल, असेही ते म्हणाले.

       

   

मुंबईत कार्यालय प्रवेशासह मंत्री मुश्रीफ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.

           

मंत्री मुश्रीफ म्हणाले, कागल, गडहिंग्लज व उतूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला सलग सहाव्यांदा निवडून दिले आहे. तसेच; २३७ जागा जिंकत महायुतीने फार मोठे बहुमत मिळविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माझ्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्रीपदाचा कार्यभार सोपविला आहे. मीही याच खात्याचा कार्यभार द्या, अशी विनंती केली होती. कारण; या आधीच्या मंत्रिमंडळात मला या खात्याचा १३ महिनेच कार्यभार मिळाला होता. त्या काळात अनेक प्रकल्प सुरू केले होते. हे प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी मी अशी मागणी केली होती. दरम्यान; या विभागांतर्गत असलेली हॉस्पिटल्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बनविण्याचे माझे स्वप्न अपुरे राहिले होते. ते पूर्णत्वाला नेण्यासाठी येत्या कार्यकाळात चांगले आणि शाश्वत जनतेच्या कायमपणे स्मरणात राहील, असे काम करू. 

          

 मुश्रीफ म्हणाले, मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल हे सर्वात मोठे हॉस्पिटल आहे. परंतु; अजूनही तिथे किडनी, लिव्हर, हृदय प्रत्यारोपण होत नाही. तसेच; मोठमोठ्या खाजगी हॉस्पिटलना सुविधा व त्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचाही मानस आहे. जे. जे. हॉस्पिटलसह नागपूरची दोन्ही हॉस्पिटल्स, आयजीएम, संभाजीनगरचे घाटी हॉस्पिटल, कोल्हापूरचे सीपीआर, लातूर, अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्पिटलला चांगल्या सोयी- सुविधा निर्माण करून देऊ. 

          

ते म्हणाले, या वर्षी केंद्राच्या धोरणाप्रमाणे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने फार मोठे कष्ट घेतले होते. राज्यात १२ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करायची होती. मी केंद्र सरकारचे आभार मानतो की, काही तांत्रिक त्रुटी असतानासुद्धा केंद्राने १० नवीन एमबीबीएस महाविद्यालयांतर्गत ९०० जागांना मान्यता दिली. या कॉलेजच्या इमारती, हॉस्पिटलच्या इमारती, इन्फ्रास्ट्रक्चर पुरवठा यासाठी फार मोठा निधी लागणार आहे. केंद्राकडून तो निधी मिळविणे आणि राज्य सरकारच्या निधीमधून नवीन मंजूर ९०० जागांसाठी नवीन १० महाविद्यालयांना चांगल्या सोयी-सुविधा पुरविणे, या कामाला प्राधान्यक्रम राहील. तसेच; एमबीबीएससह पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. त्यांना सगळ्याच सोयी- सुविधा देण्याचे कामही आम्हाला करावे लागणार आहे. राज्यात काही आयुर्वेद, होमिओपॅथिक महाविद्यालये सुरू केली आहेत. येणाऱ्या काळात त्याचीही परिपूर्णता करण्याचे आव्हान आहे. देशातील पहिले निसर्गोपचार व योगा महाविद्यालय राज्यात सुरू केले आहे. तसेच; युनानी पद्धतीचे पहिले शासकीय महाविद्यालयही राज्यात काढले आहे. या सगळ्याची पूर्तता करू आणि सबंध महाराष्ट्राच्या स्मरणात राहील असे चिरंतन काम होईल, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.