महावीर गार्डन सुशोभीकरण विकास आराखडा तयार करा : आ. राजेश क्षीरसागर

महावीर गार्डन सुशोभीकरण विकास आराखडा तयार करा : आ. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर  :शहरात अनेक उद्याने कडक उन्हापासून नागरिकांना सावली, मोकळा श्वास आणि सहवास देतात. मात्र, या उद्यानांची म्हणावी तशी निगा प्रशासनाकडून ठेवली जात नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महावीर उद्यान असे असुविधांच्या विळख्यात सापडले आहे. या उद्यानात रोज शेकडो लोक येत असतात. सकाळचा व्यायाम करण्यासह फिरावयास येणाऱ्या जेष्ठ नागरिक व महिलांची संख्या अधिक आहे. परंतु या नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा देणे आवश्यक आहे. महावीर गार्डन मधील समस्या सोडवून आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी सुशोभिकरण विकास आराखडा तयार करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपलिका प्रशासनास दिल्या. 

आज सकाळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत मॉर्निंग वॉक करत फिरावयास येणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 

यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, महावीर उद्यान शहराच्या मध्यवर्ती असल्याने याठिकाणी सकाळी व संध्याकाळी फिरावयास, व्यायामास, विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या हजारांच्या घरात आहे. उद्यानाजवळ जिल्हाधिकारी कार्यालय, उद्योग भवन तसेच जिल्हा परिषदेचे कार्यालय असल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून असंख्य लोक येथे येत असतात. त्यांच्यासाठी महावीर उद्यान ही हक्काची जागा आहे. तसेच संध्याकाळी लहान मुलांसाठी येथे 'किडझोन' तयार होतो. कॉलेजवयीन तरुण ते ज्येष्ठ नागरिकांसाठी जिव्हाळ्याचे ठिकाण असलेल्या महावीर उद्यानातील समस्यांकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. याकरिता महावीर गार्डन सुशोभीकरण विकास आराखडा तयार करा, अशा सूचना आमदार क्षीरसागर यांनी  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांना दिल्या.

तसेच या गार्डन मधील असलेल्या बाकी समस्या तात्काळ सोडवाव्यात तसेच महिलांसाठी ओपन जिमची असलेली मागणी पूर्ण करावी, नैसर्गिक ट्रॅक तयार करावेत, या गार्डनमध्ये झाडे लावावीत अशा सूचनाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्तांना दिल्या.

यावेळी माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जेष्ठ नागरिक अनिल शिंदे, जयेश कदम, राहुल देसाई, संगिता कलशेट्टी आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.