महेश मांजरेकर, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे व भीमराव पांचाळे यांना राज्य सरकारकडून मानाचे पुरस्कार

महेश मांजरेकर, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे व भीमराव पांचाळे यांना राज्य सरकारकडून मानाचे पुरस्कार

मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यावर्षीचे पुरस्कार विजेते जाहीर केले. महेश मांजरेकर, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे आणि भीमराव पांचाळे यांना या वर्षीचे प्रतिष्ठित पुरस्कार मिळणार आहेत. महेश मांजरेकर यांना यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारात 10 लाख रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक दिले जाणार आहे.

मुक्ता बर्वे यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्राप्त होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाचा स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार यंदा अनुपम खेर यांना मिळणार आहे, तर विशेष योगदान पुरस्कार काजोल देवगण यांना जाहीर झाला आहे. तसेच, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळे यांना दिला जाणार आहे. सर्व पुरस्कार 25 एप्रिल रोजी एन.एस.सी.आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात वितरित होणार आहेत.

याशिवाय, 20 एप्रिल रोजी संविधान अमृत महोत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गेटवे ऑफ इंडिया येथे संगीतिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, यामध्ये विविध कलाकार सहभागी होणार आहेत.