मार्गशीर्ष, दत्त जयंती उत्सवानिमित्त कोल्हापूर ते अक्कलकोट पदयात्रेचे आयोजन : अमोल कोरे
कोल्हापूर : मार्गशीर्ष व दत्त जयंती उत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील पाचशेहून अधिक भक्त गेली नऊ वर्षे अक्कलकोटला पायी चालत जात आहेत. यावर्षी सोमवार, दि. 2 डिसेंबर रोजी या सोहळ्यासाठी सायंकाळी चार वाजेपर्यंत कोल्हापूर येथील प्रयाग चिखली, पंचगंगा नदी संगम, दत्त मंदिर येथे सर्व पदयात्रेकरू जमणार आहेत. दुसऱ्या दिवशी मंगळवारी ३ डिसेंबर रोजी पहाटे संगमावर गंगा स्नान, श्री स्वामी समर्थ महाराजांना रुद्राभिषेक , पदयात्रा संकल्प पूजा, महाआरती, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपत दत्त मंदिर व वटवृक्षाला १०८ प्रदक्षिणा, सामुदायिक नामस्मरण जप असे विधीपूर्वक कार्यक्रम होऊन अक्कलकोटच्या दिशेने पदयात्रा प्रस्थान होणार असल्याची माहिती पदयात्रेचे अध्यक्ष अमोल कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पदयात्रेची सुरुवात २ डिसेंबर रोजी प्रयाग दत्त मंदिर येथून होणार असून पदयात्रेचा समारोप १४ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सवानिमित्त सुंटवडा घेतल्यानंतर होईल. ज्या भाविकांना या पदयात्रा सोहळ्यात सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी समर्थ फौंडेशन, दुसरा मजला, दसरा चौक ते व्हीनस काॅर्नर दरम्यान, घुणके हॉस्पिटलच्या वरती, कोल्हापूर येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी या पत्रकार परिषदेस रमेश चावरे, सुहास पाटील, यशवंत चव्हाण, वेणूताई सुतार आदी उपस्थित होते.