आय.टी.क्षेत्रासाठी आरक्षित जागेच्या वाटपाचा प्रस्ताव शासनास सादर करा : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (प्रतिनिधि) : कोल्हापुरात २५ जून रोजी राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद पार पडत आहे. यामाध्यमातून कोल्हापुरातील उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, व्यापार यासह शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. भारतातील विकसित शहरांचा विचार करता बेंगलोर, हैदराबाद, पुणे आदी शहरामध्ये आयटी क्षेत्र सर्वात जलद गतीने कार्यानिव्त झाले आहे. या ठिकाणची भौगोलिक स्थिती आयटी क्षेत्रासाठी पूरक असून आयटी क्षेत्रासाठी सुमारे १२९०० चौ.मी जागा आरक्षित करूनही त्याचे वाटप झाले नसल्याने आयटी क्षेत्र कोल्हापूर शहर आयटी क्षेत्रात मागे राहिले आहे. त्यामुळे आरक्षित जागेच्या वाटपाबाबतचा प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासनास दिल्या.
कोल्हापूर आयटी असोसिएशनच्या मागण्यासंदर्भात आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिका येथे आढावा बैठक पार पडली.
यावेळी महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आयटी असोसिएशन कोल्हापूरचे प्रताप पाटील, प्रसन्न कुलकर्णी, रणजीत नार्वेकर, राहुल मींच, शांताराम सुर्वे, विश्वजित देसाई, कैलास मेढे, मंदार पेटकर, मनिष राजगोळकर, स्नेहल बियाणी, आदिनाथ पाटील, धवल चौगुले, सुर्यकांत दोडमिसे आदी उपस्थित होते.