लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म अपलोडसाठी सर्व्हर अपडेट करा- भाजप

लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म अपलोडसाठी सर्व्हर अपडेट करा- भाजप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.  ही योजना महाराष्ट्रातआणण्यात आली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच सरकारच ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरण्यास सुरवात झाली आहे. मात्र ज्या अॅप्लिकेशनवर अर्ज सादर करायचे आहेत तेच अॅप ‘सर्व्हर डाऊन’ झाल्याने अंगणवाडी सेविकांसह मोबाईलच्या माध्यमातून फॉर्म भरणारे सर्व हतबल झाले आहेत. या विषयात आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट देऊन निवेदन सादर केले.

याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, या नोंदणीसाठी नारीशक्ती ॲप वापरले जायचे परंतु या ॲप मध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाले आहेत यानंतर शासनाने या नोंदणीसाठी एक पोर्टल नव्याने सुरू केले आहे परंतु त्यामध्ये देखील त्रुटी निर्माण झाले आहेत गेले पाच दिवस हे पोर्टल कार्यरत नाही आहे त्यामुळे हजारो अर्ज प्रलंबित आहेत या पोर्टलमध्ये लवकरात लवकर तांत्रिक सुधारणा करावी जेणेकरून अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. 

तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचे फॉर्म अपलोडसाठी तातडीने उपयोजना करून नोंदणीचा सर्व्हर अद्यावत करा, अथवा हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यासाठी विशेष कक्षाची नेमणूक करावी. अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. 

अंगणवाडी सेविकांकडे हजारो अर्ज प्रलंबित आहेत. दिवसभर ‘सर्व्हर डाऊन’ आणि रात्री थोडावेळ सर्व्हर सुरु होऊन २४ तासात केवळ चार ते पाच अर्ज भरले जात असल्याने हे काम करणाऱ्यांची डोकेदुखी वाढत असल्याचे सांगितले. अनेक भगिनी या योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी शासन स्तरावर याविषयी लवकरात लवकर पाठपुरावा करण्याची मागणी  प्रदेश सचिव महेश जाधव यांनी याप्रसंगी बोलताना केली.