मुनी महाराजांची निर्घृण हत्या; तुकडे करून टाकले कूपनलिकेत.. पोलिसांच्या सतर्कतेमुळे उकलल हत्येचं गूढ..!
कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रमोद जगताप
हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमचे आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.गेल्या दोन दिवसांपासून ते आश्रमातून अचानक गायब झाल्यामुळे भाविकांच्यात चिंतेच वातावरण पसरले. शोधाशोध सुरू केली.तसेच परिसरातील आश्रमांतही ते शोधून सापडले नसल्याने शुक्रवारी सकाळीच आश्रमाच्या ट्रस्टीकडून मुनी महाराज बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलिसांत दिली होती.त्यानंतर चिक्कोडी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला.
पोलिसांनी तपासात दोन दिवसांत आश्रमात कोण-कोण आले होते, याची माहिती घेऊन संशयावरून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पैशांच्या देवघेवीवरून जैन मुनींची हत्या केल्याची तोंडी कबुली दिली.
त्यानंतर संशयितांना घेऊन मृतदेह शोधण्याचे काम शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच सुरू केले. कूपनलिकेत मृतदेह तुकडे करून टाकल्याचे संशयितांनी सांगितले. पोलिसांनी विविध मशिन, यंत्राच्या साहाय्याने कूपनलिकेच्या आजूबाजूला खोदाई करून आतमध्ये मृतदेहाचे शोधकाम सुरू केले.जिल्हा पोलिस अधीक्षक संजीव पाटील व उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू होता.
दिवसभरात ही माहिती जिल्ह्यात पसरताच कर्नाटक व महाराष्ट्रातील मुनींचे भक्तांनीही हिरेकोडीतील मठाकडे व रायबाग तालुक्यातील कटकभावीकडे धाव घेतली.या मूळ परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
मुनींची हत्या झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये म्हणून रात्रीपासूनच पोलिसांची जादा कुमक मागविली होती. कटकभावीत सुरू असलेल्या शोधकार्याच्या ठिकाणी व हिरेकोडी आश्रमाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला होता.
तीस फुटांवर मिळाले अवशेष
मठात हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून कूपनलिकेत टाकलेले अवशेष काढण्यासाठी परिसरात यंत्रासह अनेक मोठ्या यंत्रांचा वापर केला. वरिष्ठ पोलिस अधिकारी तळ ठोकून होते. ७०० फूट कूपनलिका असल्याने भोवती खोदाई केली. त्यानंतर कूपनलिकेत ३० फुटांवर हे मृतदेहाचे अवशेष सापडले.
पोलिसांनी ते उत्तरीय तपासणीसाठी तसेच फॉरेन्सिक तपासासाठी बेळगावला पाठवले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.