‘जलजीवन मिशन योजने’ची चौकशी सुरू

‘जलजीवन मिशन योजने’ची चौकशी सुरू

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

‘जलजीवन मिशन योजने’साठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया तसेच काही कामांबाबत झालेल्या तक्रारींसंदर्भात वरिष्ठ सदस्य समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या विशेष कार्यकारी अधिकारी तथा मुख्य अभियंता मनीषा पलांडे हे या चौकशी समितीचे प्रमुख आहेत.

जिल्हा परिषदेमध्ये दुपारी बारा वाजता समिती प्रमुख पलांडे यांच्यासह महेश पाटील अधीक्षक अभियंता राज्यपाणी व स्वच्छता मिशन मुंबई, प्रवीण म्हात्रे उप अभियंता तसेच डॉ. भराटे कक्षा अधिकारी पाणीपुरवठा विभाग मंत्रालय अशा सहा सदस्य समितीने आज दुपारी बारापासून सायंकाळी उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी केली.

जलजीवनच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाने समिती स्थापन केली होती. ही समिती रद्द करून जिल्हा परिषदेसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणारी दुसरी समिती स्थापन केली. या समितीने अहवाल सादर केला. त्यानंतर अशोक धोंगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. त्याला स्थगिती मिळाल्यानंतर धोंगे यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या निलंबनाची घोषणा विधान परिषदेत करण्यात आली. 


जलजीवनच्या चौकशीसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या विशेष कार्य अधिकारी व मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. आज या समितीने कागदपत्र तपासणीच्या कामाला सुरुवात केली आहे.