‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला अखेर भारताने ठोस उत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या प्रमुख तळांचा नायनाट करण्यात आला.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याला कठोर उत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाने लक्ष्यित हल्ले करत दहशतवाद्यांच्या तळांवर प्रहार केला.

या कारवाईनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं. त्यांनी ट्वीट करत म्हटलं, “भारताच्या सार्वभौमत्वासाठी लढणाऱ्या जवानांवर प्रत्येक भारतीयाचा विश्वास आहे. आज त्याच विश्वासाला सार्थ ठरवत भारतीय हवाई दलाने अतिरेक्यांच्या ९ तळांवर अचूक कारवाई केली. या शौर्यपूर्ण कामगिरीचा देशाला अभिमान आहे. भारतीय जवानांचं मनःपूर्वक अभिनंदन! जय हिंद!”

विशेष बाब म्हणजे या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांना कोणताही धक्का न लावता केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं, हे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं.

भारताने हल्ल्यानंतर जागतिक समुदायालाही माहिती दिली आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन यासारख्या महत्त्वाच्या देशांना कारवाईची माहिती देऊन भारताची भूमिका स्पष्ट करण्यात आली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यामुळे दहशतवादी गटांच्या हालचालींना मोठा झटका बसला असून, पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय दबाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.