राजकीय मतभेद असूनही ठाकरे बंधूंच्या मैत्रीत ओलावा कायम : संजय राऊत

राजकीय मतभेद असूनही ठाकरे बंधूंच्या मैत्रीत ओलावा कायम : संजय राऊत

मुंबई : राज आणि उद्धव ठाकरे यांचं नातं केवळ राजकारणावर आधारित नाही, ते खूप खोल आहे, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. अनेक वर्षे या दोघांच्या प्रवाहात राहिल्यानं मला त्यांच्या भावना माहिती आहेत, असंही ते म्हणाले. राजकारणामुळे नाती तुटत नाहीत, आणि उद्धव ठाकरे हे खूप सकारात्मक वृत्तीचे नेते आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजप नेते आशिष शेलारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, "राज आणि आमची मैत्री संपली नाही. पूर्वी आम्ही एकमेकांची नकला केली, टीका केली, पण त्या सगळ्या गोष्टी वैयक्तिक नव्हत्या." शेलार आणि राज ठाकरे यांच्यातील मतभेदांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, त्याला काही वैयक्तिक कारण आहे का?

राऊत यांनी खुलासा केला की रिपब्लिकन पक्षाच्या एका प्रमुखाने त्यांच्याशी संपर्क साधून, जर ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील, तर आम्हीही मागे राहणार नाही, असं सांगितलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या एकजुटीच्या प्रयत्नांची आठवण करून देत त्यांनी सांगितलं की, आंबेडकरी चळवळीतील लोकही आता संवाद साधत आहेत.

शेवटी, राऊत म्हणाले की ते लवकरच उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. "दोन भाऊ भेटणार असतील, तर त्यात गैर काय आहे? मी तर दोघांच्याही घरचा पाहुणा आहे. राजकारणाने वेगळे झालो, पण आपुलकी आणि स्नेह आजही आहे," असं सांगत त्यांनी दोघांच्या पुन्हा एकत्र येण्याची शक्यता सूचित केली. उद्धव ठाकरे यांच्यात अहंकार नाही, आणि कटुता तर अजिबातच नाही, हे त्यांनी ठामपणे सांगितलं.