शरद पवार ,छगन भुजबळ येणार एकाच मंचावर ; नेमकं काय घडणार ?

शरद पवार ,छगन भुजबळ येणार एकाच मंचावर ; नेमकं काय घडणार ?

पुणे : चाकण (ता. खेड) येथील महात्मा जोतिराव फुले मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर आज (शुक्रवारी ता. ३) सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार व आमदार छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या पुतळ्यांचे अनावरण होणार आहे. त्यानिमित्ताने हे दोन्ही नेते पक्ष फुटीनंतर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. 

पक्ष फुटीनंतर आणि गेल्या काही दिवसांमध्ये भुजबळांनी केलेली वक्तवे, बोलून दाखवलेली खदखद यामुळे शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात या कार्यक्रमामध्ये काही चर्चा होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त पुण्यातील कार्यक्रमात भुजबळ-पवार एकत्र येत आहेत. चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फूले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ उपस्थित असणार आहेत. सायंकाळी साडे चार वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. 

साताऱ्यात फडणवीस आणि भुजबळ एकाच मंचावर 

सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगावात आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ एकत्र एका व्यासपीठावर येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या कार्यक्रमाला उपस्थित असतील. मात्र, अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. 

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांना स्थान मिळालेले नाही, त्यानंतर त्यांनी अजित पवारांवरती थेट टीका केली आणि तरी देखील अजित पवार यांनी त्यांच्या नाराजीबाबत अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नसल्याची चर्चा होती, त्यानंतर छगन भुजबळ परदेशात गेले होते. आज शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र एका मंचावरती दिसणार आहेत, त्यामुळे हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.