राजाराम तलाव परिसरात वृक्ष संवर्धनासाठी ठिबक सिंचन योजना राबवणार- आ. ऋतुराज पाटील

राजाराम तलाव परिसरात वृक्ष संवर्धनासाठी ठिबक सिंचन योजना राबवणार- आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजाराम तलाव परिसरात लावलेल्या दोन हजार झाडांना दररोज योग्य पाणीपुरवठा व्हावा यासाठी याठिकाणी ठिबक सिंचन योजना करण्यात येणार असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यानी दिली.  या परिसरात लावलेल्या झाडांची पाहणी आमदार ऋतुराज पाटील यांनी केली.

आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘माय ट्री माय कोल्हापूर’ उपक्रमातर्गत रविवारी 11 ऑगस्ट रोजी राजाराम तलाव परिसरात दोन हजार झाडे लावण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट देऊन झाडांची पाहणी केली. यावेळी त्यांनी राजाराम तलाव परिसरात करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देवू अशी ग्वाही दिली.

 राजाराम  तलाव परिसरातील  या झाडांना सध्या टॅंकरने पाणी देण्यात येत असून खतेही  घालण्यात आली आहेत. या झाडाना योग्य पद्धतीने कायम स्वरूपी पाणी पुरवठा व्हावा यासाठी याठिकाणी ठिबक सिंचन योजना राबवण्याचा निर्णय आमदार ऋतुराज पाटील यांनी घेतला आहे.त्यांनी या  ठिबक सिंचन योजनेबद्दल सूचना केल्या. हा परिसर सुरक्षित राहावा यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे यांनी ग्रामपंचायतीच्या दोन टँकर मधून झाडांना पाणी देत असल्याचे सांगून या ठिकाणी झाडांची निगा ठेवण्यासाठी सूचना देणारे  बोर्ड लावण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी या उपक्रमाचे  समन्वयक  प्राचार्य डॉ. महादेव नरके, जनसंपर्क अधिकारी डी. डी. पाटील, सरनोबतवाडी ग्रा.पं. सदस्य योगीराज अडसूळ, सतीश लाड, अनिल गजबर, बाळकृष्ण खोत, अक्षय मोरे, शरद भोसले, खंडेराव माने, अरुण भोसले, तळसंदे फार्म हेड प्रा. अमोल गाताडे, मिलिंद संकपाळ, विवेक राणे, महादेव वांगीकर , यांच्यासह सरनोबतवाडी आणि उजळाईवाडी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.