नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घ्या ..; मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित केलेल्या शासकीय रुग्णालयांसंबंधात ADB बँकेकडून प्राप्त निधी उपलब्ध करुन देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना निधीचा योग्य वापर करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने हाती घेण्याच्या सूचना दिल्या.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील काही शासकीय रुग्णालये वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. या रुग्णालयांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुसज्ज आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून (ADB) निधी प्राप्त झाला आहे. या निधीच्या प्रभावी वितरणासाठी आणि उपयुक्त वापर सुनिश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खालील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली -
- निधीचे नियोजन व वितरणाचे तंत्र
- रुग्णालयांच्या गरजांनुसार प्राधान्यक्रम ठरवणे
- यंत्रसामग्री, इमारतींचे नूतनीकरण, मनुष्यबळाची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करणे
- निधीच्या वापरावर सतत देखरेख व प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीची स्थापना
या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम. हसन मुश्रीफ, नाम. प्रकाश आबिटकर, यांच्यासह संबंधित खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.