लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ करा-आम.ऋतुराज पाटील

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ करा-आम.ऋतुराज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी): ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली  याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना दिले. आमदार पाटील यांनी दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, या योजनेची कागदपत्रे किंवा फोटो अपलोड करताना पाच एमबी पर्यंत साईज आवश्यक करण्यात आली असून ती वाढवणे आवश्यक आहे. लाभार्थीचा प्रत्यक्ष फोटो ऐवजी हार्डकॉपी फोटो अपलोड करण्याची सुविधा द्यावी.

सध्या नारीशक्ती दूत या ॲपवर एकाच वेळी हजारो लोक नोंदणी करत असल्याने फॉर्म भरण्याचा वेग खूप कमी आहे. अगदी पहाटे किंवा मध्यरात्रीही साधारणपणे एक फॉर्म भरण्यास २५ ते ३०  मिनीटांचा कालावधी लागतो. हा वेळ कमी होण्यासाठी उपाययोना करावी. बऱ्याच ठिकाणी पहाटे फॉर्म भरले जात असल्याने भल्या पहाटे फॉर्म भरण्यासाठी सेतू सुविधा केंद्रावर महिलांच्या रांगा लागत आहेत. महिला भगिनीना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी ‘नारीशक्ती दूत’ ॲप बरोबरच  कॉम्प्युटरच्या मदतीने फॉर्म भरता येईल ,अशी सुविधा देण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. या योजनेचे फॉर्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, मदतनीस, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत यांच्याकडे आहे. मात्र या सर्वांना ऑनलाईन फॉर्म भरण्याबाबत पुरेशी तांत्रिक माहिती नसल्याने त्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे. या योजनेसाठी आवश्यक तांत्रिक बाबीमध्ये योग्य सुधारणा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आमदार पाटील यांनी याबाबत या योजनेचे नोडल अधिकारी सुहास वाईंगडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. शासनाची ही योजना जास्तीत जास्त लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. प्रशासनाने यासाठी सहकार्य करावे, असे आ.पाटील यांनी सांगितले .