वाईत गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ- खास.डॉ.अमोल कोल्हे

वाईत गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ- खास.डॉ.अमोल कोल्हे

सातारा (प्रतिनिधी) : वाई विधानसभा मतदारसंघातील परिवर्तनाची हाक देत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीचा उमेदवार कितीही बलाढ्य असला, तरी त्याला हरवण्याची इच्छा आणि एकजूट असल्यास परिवर्तन अटळ आहे, असे प्रतिपादन केले. त्यांनी शरद पवारांच्या विचारधारेची प्रतारणा करणाऱ्या गद्दारांना धडा शिकवण्याचे आवाहन मतदारांना केले. येथील चित्रा टॉकीजमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत कोल्हे बोलत होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी सेलचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आणि महिला अध्यक्षा संजना जगदाळे उपस्थित होते.

खासदार कोल्हे म्हणाले, "शरद पवार यांना सोडून सत्तेत गेलेल्या विद्यमान आमदारांनी अडीच वर्षांच्या काळात विकास केला, तर निवडणुकीच्या तोंडावर सरकारने फसव्या योजना जाहीर करण्याची गरज का पडली? आज देशात महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. कांदा, सोयाबीन, दुधाला योग्य दर मिळत नाही. महिलांना १५० रुपयांची मदत नको, तर सुरक्षितता, तरुणांसाठी रोजगार, आणि शेतकऱ्यांसाठी शेतीमालाला हमीभाव मिळायला हवा. त्यामुळे महाविकास आघाडी ही स्वाभिमानाची लढाई लढत आहे."