२००९ ची पुनरावृत्ती या निवडणुकीतही होईल; कागलची भूमी आणि पाणी स्वाभिमानी - माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा विश्वास

२००९ ची पुनरावृत्ती या निवडणुकीतही होईल; कागलची भूमी आणि पाणी स्वाभिमानी - माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा विश्वास

 मुरगुड (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेब म्हणतात, त्यांना जे सोडून जातात त्यांचा पराभव होतो. परंतु; मी त्यांचा आदर ठेवून अत्यंत विनयाने सांगतो, २००९ ला लोकनेते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिकसाहेब त्यांना सोडून गेले. ते पराभूत झाले नाहीत. उलट; बंडखोरी करून त्यांनी क्रांतिकारी आणि ऐतिहासिक विजय मिळविला. तशीच पुनरावृत्ती या निवडणुकीतही होऊन पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांनी व्यक्त केला. स्वर्गीय खासदार कै. मंडलिक यांना जनतेचे समर्थन होते. हसन मुश्रीफ यांनाही जनतेचे समर्थन आहे, असेही ते म्हणाले.

         

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ मुरगुड येथे आयोजित विराट जाहीर सभेत मंडलिक बोलत होते.

          

प्रा. मंडलिक पुढे म्हणाले, कागल तालुक्याचा इतिहास पाहता आजवरच्या राजा विरुद्ध प्रजा लढाईत आतापर्यंत प्रजाच विजयी होत आली आहे. या निवडणुकीतही प्रजाच विजयी होईल.

        

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेली ३५-४० वर्षे समाजकारण आणि राजकारणात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करीत आलो. या निवडणुकीतही मोठ्या मताधिक्यांचे पाठबळ द्या, येणारी पाच वर्षे तुमचा हमाल म्हणून सेवा करीन.

नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, ज्या- ज्या वेळी मंडलिक पार्टी आणि पाटील पार्टी एकत्र येते त्या- त्यावेळी क्रांती होते. या विधानसभा निवडणुकीतही आम्ही मंडलिक गट आणि पाटील गट एकत्र आहोत. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या ऐतिहासिक विक्रमी मताधिक्याच्या रूपाने क्रांती होईल, असेही ते म्हणाले.  मुश्रीफ यांना मत म्हणजे ग्रामदैवत श्री. अंबाबाई देवीला मत, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

*त्यांच्या दारात कोण उभारणार....?*

प्रवीणसिंह पाटील म्हणाले, विरोधी उमेदवार हे राजे आहेत. राजे ते राजेच असतात. त्यांच्या दारात जाऊन कोण उभारणार? आमच्या बाजूला ३५ -४० वर्ष जनतेच्या दारात जाऊन कामे करणारा लोकसेवक आहे. त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणूया.     

खासदार धैर्यशील माने, अंबरीशदादा घाटगे, पक्ष निरीक्षक अमृता घुले, विजय काळे, उत्तम कांबळे, दत्ताजी देसाई, अनिल सिध्देश्वर, मधूकर पाटील, दिगंबर परीट यांनी मनोगत व्यक्त केले.

            

व्यासपीठावर माजी आमदार संजयबाबा घाटगे, सुनीलराज सूर्यवंशी, रणजीत मुडुकशिवाले, धोंडीराम चौगले, दिग्विजय पाटील, रणजीत सूर्यवंशी, डॉ. सुनील चौगले, नामदेव भांदिगरे, ॲड. सुधीर सावर्डेकर, राजू आमते, विकास पाटील, धनाजी गोधडे, शिवाजी चौगले, जगन्नाथ पुजारी, सुहास खराडे, संजय मोरबाळे आदी उपस्थित होते.

     

स्वागत नामदेवराव मेंडके यांनी केले.सूत्रसंचलन ए. एन. पाटील यांनी केले. आभार जयसिंग भोसले यांनी मानले.