शरद पवार मोठे नटसम्राट! तर भुजबळ..! संजय राऊतांचा टोला कोणाला?

शरद पवार मोठे नटसम्राट! तर भुजबळ..! संजय राऊतांचा टोला कोणाला?

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शरद पवारांनी भेटण्यास नकार दिल्यामुळे भुजबळ तासभर तिथेच बसून राहिले आणि नंतर झालेल्या दीड तासांच्या बैठकीत आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. यावर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर बारामतीमध्ये जोरदार टीका केली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेण्याचा प्रयत्न केला. पवारांनी सुरुवातीला भेटण्यास नकार दिला, मात्र भुजबळ तासभर तिथेच थांबले. अखेर झालेल्या दीड तासांच्या बैठकीत आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाल्याचे समजते, परंतु यामागे वेगळे राजकारण असल्याचे तर्क लावले जात आहेत.

या घटनाक्रमावर भाष्य करताना संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करत शरद पवारांना "नटसम्राट" असे संबोधले. त्यांनी म्हटले, "छगन भुजबळ मोठे कलाकार आहेत. त्यांनी चित्रपटातही काम केले आहे. नाट्य निर्मिती करण्यात ते तरबेज आहेत. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट आहेत, तर भुजबळ हे फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत."

राऊतांनी असेही सांगितले की, भुजबळांनी शरद पवारांकडे अचानक केलेली भेट राज्याच्या राजकारणात हंगामा निर्माण करणारी ठरली आहे. भविष्यात काय होईल, हे सर्वांनी पाहावे असेही त्यांनी म्हटले.