'त्यानं' तब्बल अडीज वर्षे केलंय पटकथेवर काम ; 'छावा' च्या मराठमोळ्या लेखकाने सांगितला अनुभव
!['त्यानं' तब्बल अडीज वर्षे केलंय पटकथेवर काम ; 'छावा' च्या मराठमोळ्या लेखकाने सांगितला अनुभव](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67a5cf9b3aee1.jpg)
मुंबई: 'छावा' सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सर्व बाजूने चित्रपटातील एका वादग्रस्त सीनवर टीका केली जात होती. शेवटी दिग्दर्शकांनी हा सीन काढून टाकण्याची तयारी दर्शवली. यानंतर या वादावर पडदा पडला.
चित्रपटातील हा वादग्रस्त सीन सोडला तर चित्रपटाचा विषय अत्यंत चांगला असल्याच्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. कलाकार, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, व्हीएफएक्स हे सगळ्याचं कौतुक होतंय.. याव्यतिरिक्त या चित्रपटाला लाभलेली कथा आणि पटकथा लिहिणारी टीमही तितकीच जबरदस्त आहे. ऐतिहासिक चित्रपट असल्याने त्याची मांडणी पडद्यावर योग्यरित्या होणे, हे खूप महत्वाचे असते आणि ही जबाबदारी लक्ष्मण उतेकर, ऋषी वीरमानी, कौस्तुभ सावरकर, उन्मन बनकर आणि ओंकार महाजन यांनी लीलया पेलली आहे. ओंकार महाजन यांची ही पहिली फिचर फिल्म असल्याने त्यांच्यासाठी हा खास अनुभव होता. त्यांचा हा आनंददायी क्षण त्यांनी सर्वांसोबत शेअर केला आहे.
ओंकार महाजन म्हणतात, '' फिचर फिल्म म्हणून हा माझा पहिला चित्रपट आणि पहिलाच चित्रपट इतक्या नामवंतांसोबत करायला मिळणे, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. यापूर्वी लक्ष्मण सरांसोबत मी असोसिएट म्हणून काम केले आहे. त्यामुळे या प्रोजेक्टसाठी त्यांनी पहिला फोन मला केला. मग हळूहळू त्यात एकेक जण सहभागी झाले. कौस्तुभने यापूर्वी 'लोकमान्य'साठी संवाद लिहिले आहेत, त्याचा इतिहासाचा अभ्यास आहे. उन्मननेही कौस्तुभसोबत काही चित्रपट केले आहेत. तर या सगळ्यांना घेऊन आमची एक टीम तयार झाली.
कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनपासून आमचे या चित्रपटावर काम सुरु झाले. सुरुवातीच्या काळात आमचे फक्त व्हिडीओ कॉन्फरन्सवर काम सुरु होते. साधारण दोन अडीच वर्षं आम्ही कथा, पटकथेवर काम केले आणि अखेर आज आमचा 'छावा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.