शाहू कारखाना सोळा फेब्रुवारीपासून गळीतास येणाऱ्या ऊसाला देणार वाढीव ऊस दर - उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे
![शाहू कारखाना सोळा फेब्रुवारीपासून गळीतास येणाऱ्या ऊसाला देणार वाढीव ऊस दर - उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67ab7b789ca12.jpg)
कागल / प्रतिनिधी : येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत चालू गळीत हंगाम २०२४-२०२५मध्ये सोळा फेब्रुवारी २०२५पासून गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रोत्साहनात्मक वाढीव ऊस दर देण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे.अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे सर्व संचालक तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना श्री घोरपडे पुढे म्हणाले ,कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांच्या पश्चातही सभासद- शेतकरी केंद्रबिंदू मानून अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. या गळीत हंगामात पंधरा जानेवारी २०२५ अखेर गळीतास आलेल्या उसाची प्रति टन रु.३१००/- प्रमाणे होणारी बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.
कारखाना व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार सोळा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी २०२५पर्यंत येणाऱ्या ऊसाला प्रतिटन पन्नास तर एक मार्चपासून पुढे गळीत हंगाम समाप्ती पर्यंत येणाऱ्या उसास प्रतिटन शंभर रुपये वाढीव प्रोत्साहनात्मक दर देण्यात येणार आहे. त्यानुसार फेब्रुवारी दुसऱ्या पंधरवड्यात गळीतास येणाऱ्या उसास प्रति टन रु.३१५० तर मार्च महिन्यामध्ये गळीत येणाऱ्या उसास प्रति टन रु.३२००/- असा ऊस दर मिळणार आहे.
तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला व कारखान्याकडे नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून या प्रोत्साहनात्मक वाढीव ऊस दराचा लाभ घ्यावा व ऊस गळीत उद्दिष्टपुर्तीस सहकार्य करावे. असे आवाहन घोरपडे यांनी केले आहे.