शिक्षक बँकेत अर्थसाक्षर भारत अभियान प्रशिक्षण संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी) : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळ व सर्व सेवकांना "अर्थसाक्षर भारत अभियान " अंतर्गत प्रशिक्षण आयोजीत करणेत आले होते. स्पार्कलींग ग्लोबल फौंडेशन, ग्लोब युनिक फौंडेशन व शिक्षक बँकेच्या संयुक्त विद्यमाने संचालक व सेवक यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी येथील महालक्ष्मी हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करणेत आले.
यावेळी बँकेचे चेअरमन बाळासाहेब निंबाळकर यांनी सध्याच्या बदलत्या व स्पर्धेच्या युगात आपल्याला टिकून रहावयाचे असेल तर नवनवीन तंत्रज्ञान तसेच प्रगत विचारांची अत्यंत आवश्यकता आहे. या शिवाय आपला निभाव लागणार नाही. जुनाट विचार पद्धतीला चिकटून रहाल तर स्पर्धेतून नक्कीच बाद व्हाल. यासाठी आर्थिक साक्षरता सारखे प्रशिक्षण आपल्या वैचारिक बदल घडणार अशी खात्री आहे.
स्पार्कलींग ग्लोबल फौंडेशनचे राहुल माने यांनी प्रशिक्षणाची सुरुवात भारतमातेच्या स्तुतीगीताने केली. राहुल माने यांनी जीवनात व व्यवसायात आपल्याला मार्गदर्शकाची निकड का असते याचा उहापोह केला. वित्त उद्योग परिचय, बैंकिंग उद्योग परिचय, आजचे आर्थिक नियोजन महत्व, सेवा आधारित उद्योग वृद्धी याचे सविस्तर विश्लेषण केले. तर बाजारातील बदलती परिस्थिती, विक्री, ग्राहकासोबत संप्रेषण कौशल्याचा विकास, विपणन नातेसंबंध या विषयांवर विक्रम चासकर, शुभम कथले यांनी मार्गदर्शन केले.
यशाच्या सवयी, प्रतिनिधी क्रियाकलाप, कार्यक्षमता कशी वाढवावी, बक्षीस किंवा दंड, कार्पोरेट क्रिया या विषयांवर निरज शिंदे, ऋचा करमरकर, उषा कथले, श्वेता चासकर यांनी सविस्तरपणे प्रशिक्षण सादर केले. झालेल्या मार्गदर्शनावर प्रशिक्षणाअंती प्रश्नोत्तरांनी सांगता झाली. भविष्यात सदर "अर्थसाक्षर भारत अभियान " अंतर्गत प्रशिक्षणाचा बँकेच्या सेवकांना निश्चितच लाभ होईल असे मनोगत बँकेचे व्हाईस चेअरमन रामदास झेंडे यांनी समारोपाच्यावेळी व्यक्त केले.
यावेळी बँकेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व सेवक उपस्थित होते.