शिवाजी विद्यापीठात ‘पोर्तुगीज चित्रपट महोत्सव’

शिवाजी विद्यापीठात ‘पोर्तुगीज चित्रपट महोत्सव’

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग आणि द कमॉइश इन्स्टिट्यूट, लिस्बन, पोर्तुगाल या दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. त्याअंतर्गत पोर्तुगीज भाषा अभ्यासक्रमही सुरु करण्यात आला आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत दोन्ही संस्थांच्यात भाषा आणि संस्कृती या क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. त्यातून मराठी लोकांना पोर्तुगीज संस्कृतीचा परिचय करून होणार आहे. तसेच अभ्यासकांना मराठी इतिहासाच्या पोर्तुगीज भाषेतील नोंदींची माहिती होणार आहे.

याच सांस्कृतिक आदानप्रदानाचा एक भाग म्हणून दि. १२ व १३ मार्च या दोन दिवशी शिवाजी विद्यापीठात ‘पोर्तुगीज चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. वनस्पतीशास्त्र विभागाच्या निलांबरी हॉलमध्ये दोन्ही दिवस दुपारी 2.00 ते 6.00 या वेळेत चित्रपट प्रदर्शन होईल. या चित्रपट महोत्सवात काही महत्त्वाच्या विषयांवरील चित्रपट दाखवले जातील.

चित्रपट प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १२ मार्च, २०२५ रोजी मा. कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के व डॉ. डेल्फिम कोरेइया द सिल्वा यांच्या उपस्थितीत १.३० वा. निलांबरी हॉल येथे होणार आहे.  

भारतीय वंशाच्या व्यक्तीशी विवाह करणारी पहिली पोर्तुगीज स्त्री एडिला गायतोंडे ही एक कार्यकर्ती, पियानो शिक्षिका, रेडिओ प्रस्तुतकर्ता आणि माहितीपट निर्माती होती. तिची कहाणी सांगणारा माहितीपट ‘द ब्लू अॅपल्स” (२०२३) अतिशय महत्त्वाचा आहे. तिचा पती पुंडलिक गायतोंडे हा सालाझारच्या हुकूमशाहीच्या काळात  एक डॉक्टर, लेखक आणि वसाहतवादविरोधी लढणारा कार्यकर्ता होता. तो गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढला. एडिलाच्या जीवनाच्या दस्तऐवजातून अज्ञात गोवा आणि विस्मृतीत गेलेल्या पोर्तुगालच्या अनेक कथा प्रेक्षकांसमोर उलगडतात.

त्याचबरोबर स्वत:च्या तरुण मुलाच्या शोधात असतानाच जंगलांची अवैध वृक्षतोड आणि ग्रामीण मजुरांच्या शोषणाचा प्रश्न घेऊन लढणारी एकल माता पुरेजा, कॅप्टन  साल्गेइरु माइया यांचा लोकशाहीसाठी संघर्ष आणि पोर्तुगाल व हैती या दोन भिन्न संस्कृतींना जोडत खऱ्या मैत्रीच्या नात्याचा अनुभव घेणारे बेर्था आणि बस्तीदी  यांच्या कथा पोर्तुगाली संस्कृतीचा परिचय करून देतात.

हा पोर्तुगीज चित्रपट महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. तरी या चित्रपट प्रदर्शानाचा लाभ घ्यावा व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विदेशी भाषा विभाग करत आहे.