शिवाजी विद्यापीठात ३ मार्चपासून गणित उपयोजनाबाबत राष्ट्रीय परिषद

कोल्हापूर प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या गणित अधिविभागात येत्या ३ व ४ मार्च रोजी “नॅशनल कॉन्फरन्स ऑन ॲप्लीकेबल मॅथेमॅटिक्स – २०२५” या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे समन्वयक डॉ. सुनिल कुंभार यांनी ही माहिती दिली आहे.
परिषदेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते होणार असून लखनऊ विद्यापीठ आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. बी. निमसे हे बीजभाषण करतील.
परिषदेत बंगळुरूच्या चाणक्य विद्यापीठाचे डॉ. एस्. श्रीनिवास राव आणि डॉ. बी. उमा, हैदराबाद विद्यापीठाचे डॉ. सचिनकुमार भालेकर, मुंबई विद्यापीठाचे डॉ. बी. एस्. देसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. विनायक जोशी, पुण्याच्या भास्कराचार्य प्रतिष्ठानचे डॉ. एस. ए. कात्रे आणि पुण्याच्याच ए.आर.डी.इ.चे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. एस्.डी. नाईक यांची व्याख्याने होतील. ४५ संशोधक शोधनिबंध सादर करतील. परिषदेसाठी “अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (ANRF) :सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड (SERB)” आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे आर्थिक सहाय्य लाभले आहे.
अधिविभागप्रमुख डॉ. सरिता ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मच्छिंद्र गोफणे, डॉ. के. डी. कुच्चे, डॉ. जे. पी. खराडे, डॉ. जे. पी. भोसले, एस. डी. थिटे आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.