मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यापीठात भावगुज

कोल्हापूर प्रतिनिधी : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ व अभिव्यक्ती कोल्हापूर यांच्यातर्फे काल (दि. २७) मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने ‘भावगुज’ हा अभिवाचनाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाचे संकलन व दिग्दर्शन भानू प्रविण देशपांडे यांनी केले. यामध्ये अंकुश कुलकर्णी, अजय वेदपाठक, हर्षवर्धन रणनवरे, अनाम देशपांडे व भानू देशपांडे हे कलाकार सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरवात काशी महाराजांच्या मंगलाचरणाने झाली. त्यानंतर शांता शेळके यांच्या एकपानी, तसेच हिमांशु स्मार्त यांच्या ‘गंधाचे मौन’ आणि ‘अवडंबराच्या निचऱ्याचे प्रकरण’ यांतील ललित गद्याचे अभिवाचन झाले. या कार्यक्रमामध्ये विं.दा. करंदीकर, आरती प्रभू, सुर्यकांत खोडेकर, वा.रा. कांत आणि अरुण कोल्हटकर यांच्या विविध कविता व गाणी सादर झाली.
मराठी भाषेतील शब्दसौंदर्य, भाषेची गोडी, काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेले शब्द, एखाद्या दृश्याचे कवीने-लेखकाने केलेले शब्दांतील वर्णन आणि भाषेद्वारे व्यक्त होणाऱ्या भाव-भावना यांचे मनोहारी वर्णन व चित्रण या अभिवाचनातून उलगडत गेले. मराठी भाषेचे मूल्य सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा हा अनोखा प्रयत्न होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले, तर डॉ. संजय तोडकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी अधिविभागातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच रसिक उपस्थित होते.