गृहमंत्री अमित शहा यांचा उद्धव ठाकरे , शरद पवारांवर घणाघात,म्हणाले त्यांनी...

शिर्डी : मतदारांनी अस्थिर आणि दगाबाजीचे राजकारण संपविले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अस्थिर आणि दगाफटक्याचे राजकारण करणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मतदारांनी कायमचे घरी बसविले आहे,’ अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघात केला.
भाजपचे प्रदेश अधिवेशन रविवारी शिर्डीत झाले. त्याच्या समारोप्रसंगी गृहमंत्री शहा बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाबद्दल कौतुक केले.
यावेळी बोलताना शहा म्हणाले, पूर्वी राज्यात चालत आलेले अस्थिरता आणि जातीयवादाचे राजकारण मोडीत काढून, जनतेने खरी शिवसेना आणि ‘राष्ट्रवादी’ कोणाची हेही दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंदुत्व आणि विकासाचे धोरण स्वीकारून विरोधकांच्या स्वप्नांचा जनतेने चक्काचूर केला आहे. या विजयाचे खरे शिल्पकार आमचे कार्यकर्ते आहेत. आता या सर्वांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे. गाव ते देश पातळीपर्यंत भाजपची सत्ता हवी. विरोधी ‘इंडीया' आघाडी आता मोकडळीस आली आहे. त्यांच्या घमेंडीमुळे त्यांच्यातील आत्मविश्वास आता संपला आहे. २०२४ हे वर्ष देशात आणि अनेक राज्यांत भाजपला सत्ता देणारे ठरले, तर नवे २०२५ वर्ष दिल्ली राज्यापासून भाजपला सत्ता देणारे ठरेल,’ असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला.