श्री आनंदराव आबिटकर डिप्लोमा इंजीनियरिंग कॉलेजला AICTE नवी दिल्ली यांची मंजुरी : अध्यक्ष अर्जुन आबिटकर

गारगोटी : युवा ग्रामीण विकास संस्था गारगोटी तालुका भुदरगड संचलित नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या श्री आनंदराव आबिटकर डिप्लोमा इंजीनियरिंग कॉलेजला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद AICTE, नवी दिल्ली यांची मंजुरी मिळाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. अर्जुन आबिटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गतवर्षी पाल (ता.भुदरगड) येथील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरीता डिग्री इंजिनीअरींग कॉलेजची सुरवात करण्यात आलेली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून भुदरगड तालुक्यातील पाल येथे डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ६० विद्यार्थी क्षमता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ६० विद्यार्थी क्षमता व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ६० विद्यार्थी क्षमता हे अभ्यासक्रम उपलब्ध झाले असून यावर्षीपासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे.
आजवर युवा ग्रामीण विकास संस्थेच्या शैक्षणिक संस्थांच्या वाटचालीस आम्ही उत्कृष्ट शिक्षण देण्यावर भर दिला आहे. तालुक्यातील होतकरू विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी संस्थेमार्फत दर्जेदार शैक्षणिक सोयी सुविधा देणाऱ्या डिप्लोमा इंजीनियरिंग कॉलेजची सुरुवात करत असल्याचे प्रा.आबिटकर यांनी सांगितले.