गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात ‘खुद से जीत’ या उपक्रमातून अधिक गती द्या – मंत्री हसन मुश्रीफ

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात ‘खुद से जीत’ या उपक्रमातून अधिक गती द्या – मंत्री हसन मुश्रीफ

 कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्ह्यामधील शालेय स्तरावर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात लसीकरण मोहीम वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात आरोग्य विभागासह शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी या अभियानाला ‘खुद से जीत’ हे नाव देऊन अधिक गती देण्याच्या सूचना केल्या. 

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात गर्भाशयाच्या कर्करोगाच्या विषयी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात चांगल्या प्रकारे काम झाले आहे. आता पुढील टप्प्यात उर्वरित सर्व पात्र मुलींना ही लस वेळेत मिळावी. यासाठी पालकांच्या संमती पत्राची प्रक्रिया शालेयस्तरावर तातडीने राबवून ‘खुद से जीत’ ही मोहीम यशस्वी करा. या कर्करोगाच्या लक्षणांविषयी महिलांमध्ये जागरूकतेचा प्रचंड अभाव असल्याने किंवा भीती असल्याने हा आजार बळवण्याची शक्यता वाढते. यातून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये तळागाळातील घटकांशी संवाद साधून गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जनजागृती करा. 

भारतीय स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. देशात दरवर्षी जवळ जवळ पंच्याहत्तर हजार महिलांना आपले जीव यामुळे गमवावे लागतात. या कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास आजार बरा होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जिल्ह्यात चांगल्या प्रकारे ‘खुद से जीत’ उपक्रम राबवून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी उपस्थितांना केले. जिल्ह्यात १७ हजार युवतींना ही लस दिली जाणार आहे. त्यापैकी ९ हजार लसीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी दिली. याबाबत पुढील दहा दिवसात कॅम्प स्वरूपात सर्व पालकांची संमती पत्र घेण्याचे काम करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दोन हजार शाळांमध्ये ही मोहीम राबवून लस देण्यात येणार आहे. 

डोळे तपासणीसह मुलींच्या स्तनाच्या कर्करोगाबाबत विशेष मोहिमेचे आयोजन होणार 

‘खुद से जीत’ या उपक्रमानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांबाबतही वेगवेगळ्या तपासण्या करून चष्म्याचे नंबर काढले जाणार आहेत. यातील ज्या मुलांना चष्म्याचे नंबर आहेत त्यांना मोफत स्वरूपात चष्म्याचे वाटप केले जाणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. या अनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांना त्यांनी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून शिक्षण विभागाच्या सहकार्याने तपासण्या करण्याच्या सूचना केल्या. 

याचबरोबर तेरा वर्षे पूर्ण झालेल्या मुलींमध्ये स्तनाचा कर्करोग आहे किंवा नाही याबाबत ही तपासणी मोहीम आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक तंत्रज्ञान मंत्री मुश्रीफ यांनी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील मुलींना, महिला भगिनींना चांगले आरोग्य मिळावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे तसेच कोणत्याही व्याधीने ग्रस्त न होता सुखी जीवन जगता यावे यासाठी वेगवेगळ्या अभियानातून आपण मदत करूयात असे सांगून यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी गाव स्तरावर विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करून महिलांविषयक असलेल्या आजारांबाबत जनजागृती करून वेगवेगळ्या तपासण्या तसेच ‘खुद से जीत’ या उपक्रमाबाबत माहिती देऊन हे उपक्रम यशस्वी करता येतील असे सांगितले. 

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर उपस्थित होत्या.