सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, न्यूज
आज कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून द्या, ओबीसी यादीचे पुनर्निरीक्षण करा, ओबीसीचे फुगीर आरक्षण रद्द करा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाच्यावतीने आज ९ ऑगस्टला क्रांतिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खास बांधलेल्या भव्य मंडपात सकाळी ११ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले.
मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रतर्फे मराठा समाजाच्या सहा मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदानात एकदिवसीय आंदोलन करण्यात येत आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून कोल्हापुरात हे धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी ‘ज्याचे गाव, त्याचे नेतृत्व’, ‘ज्याचा विचार, त्याचा पुढाकार’, ‘लढा समाजाचा, जोश युवा तरुणाईचा’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. शिवाजी पेठेतील सर्व तालमी, तरुण मंडळे आणि संघटना एकजुटीने या धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.