समर्पित भावनेने केलेल्या कामाची प्रचिती म्हणजे पिराचीवाडीचा कायापालट - ना. हसन मुश्रीफ
कागल (प्रतिनिधी) : कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने काम केल्यानंतर गावागावांचा किती सुंदर कायापालट होऊ शकतो, याची प्रचिती म्हणजे कागल तालुक्यातील पिराचीवाडी गाव होय. उंचच उंच डोंगरकपारीत वसलेल्या या गावाला हरितक्रांती झाल्याचे समाधान तर आहेच. तसेच; विकासकामांच्या माध्यमातून गाव सर्वांगसुंदर होऊन मोठ्या प्रमाणात कायापालट झाला. ऐतिहासिक वारसा असलेल्या या गावात प्रगतीपथावर असलेली शिवसृष्टीही कौतुकास्पद आहे. माजी सरपंच सुभाष भोसले यांच्यासह त्यांच्या पत्नी विद्यमान सरपंच सौ. कल्पना भोसले, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या जिद्दीतून ही किमया घडल्याचेही, ते म्हणाले.
मंत्री मुश्रीफ पिराचीवाडी ता. कागल येथील जाहीर प्रचारसभेत बोलत होते.
गोकुळ संचालक अमरीश घाटगे म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी मिळालेला सत्तेचा उपयोग करीत मतदारसंघातल्या वाड्यावस्त्यांवर विकासाची गंगा आणली. पिराच्यावाडीसारख्या दुर्गम वाडीचा चेहरा-मोहरा बदलून टाकला, हे त्यांच्या कामाचं उत्तम उदाहरण आहे. उंच दुर्गम डोंगरमाथ्याच्या उंचीवर हे गाव वसलं होतं. मात्र; कामाच्या माध्यमातून हे गाव राज्याच्या नकाशावर आणण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केलं आहे.
जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे म्हणाले, माझ्या कार्यक्षेत्रातील ही पिराचीवाडी भौतिक सोयी सुविधांपासून वंचित होती. मात्र मंत्री मुश्रीफ यांनी या गावचा नियोजनबद्ध विकास केला असून आज येथे येताना प्रचंड बदललेलं गाव पाहून ऊर भरून येतो.
सरपंच कल्पना भोसले म्हणाल्या, या गावचा सर्वांगीण विकास आमचे नेते मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्याच माध्यमातून झाला असून गावचा विकास पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्यातून लोक येतात याचा अभिमान वाटतो.
पिराचीवाडी येथे स्वागत व प्रस्ताविक माजी सरपंच सुभाष भोसले यांनी केले. व्यासपीठावर डी. एम. चौगले, विश्वास डावरे, पी. डी. भोसले, दिलीप लाड, संजय भोसले, गजानन लाड, उपसरपंच युवराज माने, ए. के. भोसले, संभाजी गौड, आनंदा भोसले, सावर्डे खुर्द येथे सागर मालवेकर , बाबुराव मालवेकर,
भिकाजी मालवेकर, आनंदा खंडागळे, तानाजी मोगने, संदीप मालवेकर, धोंडीराम मोगणे, आबाजी कांबळे, महादेव तुरंबेकर, महादेव मालवेकर, प्रविण मालवेकर, आनंदा उबारे, करबा पसरे, के एम शिंदे, संभाजी मालवेकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.
विधायकतेची पाठराखण.......
मंत्री मुश्रीफांचे विधायक काम वाड्या-वस्त्यांमधील घराघरात पोहोचले आहे, असं सांगत गोकुळचे संचालक अमरीश घाटगे म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी मतदारसंघात प्रचंड विकास कामे तर केलीच. शिवाय; त्याला विधायकतेची जोड सुध्दा दिली आहे. त्यांच्या या अनन्यसाधारण कार्याचा सुगंध चिरंतन स्मरणात राहील.