सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - समरजितसिंह घाटगे
बिद्री प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य व उपकेंद्राच्या ठिकाणी पुरेसा स्टाफ व औषधे उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.या त्रुटी दूर करून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशिल राहू. अशी ग्वाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
बिद्री (ता.कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास दिलेल्या भेटीनंतर नागरिकांशी ते बोलत होते.येथील आरोग्य केंद्रातील त्रुंटींबाबत या परिसरातील नागरिकांनी घाटगे यांच्यासमोर कैफियत मांडली होती.तसेच सोशल मीडियावर काही जागरूक तरुणांनी एका व्हिडिओद्वारे या त्रुटी दूर करण्याबाबत आवाज उठवला होता. यानंतर घाटगे यांनी या आरोग्य केंद्रास तातडीने भेट दिली.वैद्यकीय अधिकारी डाॕ. श्वेता पाटील व डॉ सौरभ शिंदे यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली.
घाटगे पुढे म्हणाले,येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य इमारतीसह कर्मचारी निवासस्थानासाठी केंद्र सरकारकडून ५कोटी ७७ लाख रु.इतका निधी मंजूर करून आणला.त्याचे बांधकामही पुर्ण झाले आहे. मात्र या ठिकाणी पुरेसा स्टाफ,औषधे व इतर सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत.त्याविना रुग्णांची गैरसोय होत आहे.शासकीय आरोग्य यंत्रणा अद्यावत व सुसज्ज करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासह कागल गडहिंग्लज व उत्तर विभागातील आरोग्य केंद्राच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने यशस्वी पाठपुरावा केला आहे.आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहू.
यावेळी संदेश पाटील,योगेश पाटील, सागर पाटील, संग्राम वारके, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.
*बैठकीतूनच घाटगेंनी केला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना फोन*
यावेळी नागरिकांनी येथील त्रुटींबाबत वैद्य अधिकाऱ्यांसमोरच पाढा वाचला. यावर घाटगे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ शिंदे व पाटील यांच्याकडून माहिती घेतली.बैठकीतूनच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ एस कार्तिकेयन यांच्याशी तातडीने मोबाईलवर संपर्क साधला.येथील रुग्णांची सोय होण्याच्यादृष्टीने त्रुटी दूर करण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.