शेवटच्या आठवड्यात 3 चित्रपटांची टक्कर, 'ग्राउंड झीरो' ने पहिल्या वीकेंडमध्ये मारली बाजी !

शेवटच्या आठवड्यात 3 चित्रपटांची टक्कर, 'ग्राउंड झीरो' ने पहिल्या वीकेंडमध्ये मारली बाजी !

मुंबई - गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या इमरान हाश्मी - सई ताम्हणकर यांचा 'ग्राउंड झीरो', प्रतीक गांधी - पत्रलेखा यांचा 'फुले' आणि सलमान खान-आमिर खान यांचा री - रिलिज झालेला 'अंदाज अपना अपना' या तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या वीकेंडमध्ये तिन्ही चित्रपटांनी समाधानकारक प्रदर्शन केले असले, तरी कमाईच्या बाबतीत 'ग्राउंड झीरो' सर्वांत पुढे आहे.

'ग्राउंड झीरो' ची मजबूत घौडदौड 

इमरान हाश्मी, सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि झोया हुसैन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने रविवारी चांगली उसळी घेतली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 1.15 कोटींनी सुरुवात झालेल्या या सिनेमाने शनिवारी 1.90 कोटी आणि रविवारी 2.15 कोटी रुपयांची कमाई करत एकूण 5.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 50 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला ‘जाट’, ‘केसरी 2’, ‘अंदाज अपना अपना’ अशा बॉलिवूड सिनेमांसोबतच मराठी सिनेमांशीही स्पर्धा करावी लागत आहे.

'फुले' चित्रपटाची गती मंद

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित अनंत महादेवन दिग्दर्शित 'फुले' या चित्रपटाची सुरुवात मात्र फारशी प्रभावी ठरली नाही. वादग्रस्त पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्डाच्या कापांनंतर प्रदर्शित झालेला हा सिनेमा तीन दिवसांत फक्त 1.23 कोटी रुपयांची कमाई करू शकला. पहिल्या दिवशी अवघ्या 15 लाख रुपयांची कमाई नोंदवल्यानंतर शनिवारी 30 लाख आणि रविवारी 78 लाख रुपये जमा झाले.

'अंदाज अपना अपना' ची नॉस्टॅल्जिक कमाई

1994 साली प्रदर्शित झालेल्या आणि नंतर 'कल्ट क्लासिक' ठरलेल्या 'अंदाज अपना अपना' या सिनेमाचा नुकताच री - रिलिज झाला. सलमान आणि आमिरच्या या गाजलेल्या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांना थिएटरकडे खेचले. तीन दिवसांत या सिनेमाने 1.05 कोटी रुपयांची कमाई केली असून, त्यात ओपनिंग डेला 20 लाख, शनिवारी 35 लाख आणि रविवारी 50 लाखांचा वाटा होता.

एकूणच पाहता, 'ग्राउंड झीरो' ने पहिल्या वीकेंडमध्ये चांगली पकड मिळवत बाकी दोन सिनेमांपेक्षा आघाडी घेतली आहे. मात्र येत्या आठवड्यात 'रेड 2' आणि 'भूतनी' सारख्या सिनेमांमुळे स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.