स्वच्छतेचे दोन रंग,ओला हिरवा,सुका निळा मोहीम राबविणार-कार्तिकेएन.एस

स्वच्छतेचे दोन रंग,ओला हिरवा,सुका निळा मोहीम राबविणार-कार्तिकेएन.एस

कोल्हापूर (प्रतिनिधी) :- स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत सन 2024-25 मध्ये जिल्हयातील सर्व गावे हागणदारीमुक्त अधिक ( ODF Plus ) मॉडेल करावयाची आहेत. मॉडेल झालेल्या गावात दृष्यमान शाश्वत स्वच्छता ठेवणे आणि हागणदारीमुक्त अधिक झालेली गावे मॉडेल करणे यासाठी विविध विषयाच्या अनुषंगाने गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृती करणेसाठी स्वच्छतेचे दोन रंग, ओला हिरवा, सुका निळा संकल्पनेची मोहिम दि.08 जुलै 2024 ते दि. 07 ऑगस्ट 2024  या कालावधीत जिल्हयातील सर्व गावांमध्ये राबविणेत येणार आहे. सदर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर करावी असे आवाहन, जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन. एस.यांनी केले आहे.

सन 2024- 2025 या वर्षात स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा- 2 अंतर्गत सद्यस्थितीत जिल्हयातील 1190 गावापैकी 157 गावे मॉडेल झाली आहेत. उर्वरित 1033 गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करण्यासाठी व दृष्यमान स्वच्छतेच्या दृष्टीने निरंतर प्रयत्न सुरु ठेवण्यासाठी गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृती करणेत येणार आहे. जेणेकरुन अत्यंत अल्पकालावधीत जास्तीत जास्त लोकांपर्यत अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन स्वच्छतेचे व्यापक जनआंदोलन उभे राहील.कुटुंबांपर्यंत स्वच्छता विषयक संदेश पोहचवून त्यांच्यात वर्तणूक बदल घडवून आणण्यासाठी व अपेक्षित कृती करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी गावपातळीवर स्वच्छतेचे दोन रंग, ओला हिरवा, सुका निळा संकल्पनेची मोहिम राबविणे बाबत राज्य स्तरावरुन सुचित केले आहे.

 जिल्हयातील 1025 ग्रामपंचायतीमध्ये प्रती ग्रामपंचायत 05 (सरपंच, उपसरंपच, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामसेवक, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही, बचत गट महिला) अशा एकुण 5125 इतक्या प्रशिक्षित संवादकांची निवड करुन या संवादकामार्फत गृहभेटी देवुन जनजागृती करणेत येणार आहे. गावातील किमान ०5 कुटुंबांना भेट देतानाचा फोटो गुगल फॉर्म वर अपलोड करणेत येणार आहे तसेच सदर गुगल फॉर्म मध्ये भेटी देण्यात येणाऱ्या गावातील सर्व कुटुंबांची माहिती भरणेत येणार आहे. गृहभेटी वेळी नियमित शौचालयाचा वापर करणे, शास्त्रयुक्त पध्दतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, प्लास्टिक व्यवस्थापन, सुयोग्य मैला गाळ व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय आणि नियमित वापर आदि बाबत माहिती कुटुंबांना देणेत येणार आहे.

सदर मोहिमेचे नियंत्रण तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांचे मार्फत व जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन मार्फत करणेत येणार आहे.