समाजाची सांस्कृतिक मूल्ये जपण्यात महिलांचे महत्वपूर्ण योगदान - डॉ. जे. के. पवार

कोल्हापूर प्रतिनिधी : "स्वातंत्र्योत्तर काळात पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून महिलांचा विकास आणि देशाच्या विकासामध्ये दिली जाणारी महिलांना संधी यामुळे महिला विविध क्षेत्रात अधिक आत्मविश्वासाने कार्यरत आहेत. प्रत्येक महिलेमध्ये व्यवस्थापन कौशल्य आहे. आजच्या काळात विकसित भारत संकल्पनेमध्ये महिलांचे योगदान उल्लेखनीय ठरत आहे. देशाच्या आर्थिक विकासात महिलांचे प्रशासकीय कौशल्य अधोरेखित होत आहे. समाजाची सांस्कृतिक मूल्ये जपण्यात महिलांचे योगदान हे अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम करीत आहे. समाजस्वास्थ्य हे आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे असते आणि ते टिकवण्यात महिला आघाडीवर आहेत", असे प्रतिपादन कोल्हापुरातील ज्येष्ठ विचारवंत, राजर्षी शाहू कार्याचे अभ्यासक, अर्थायनकार डॉ. जे. के. पवार यांनी केले.
ते सातारा नगरपरिषदेमधील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान समारंभ आणि "आर्थिक विकासात प्रशासनातील महिलांचे योगदान" याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलत होते.
सातारा नगरपरिषदेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याधिकारी अरविंद दामले होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अतिरिक्त मुख्याधिकारी ऐश्वर्या नाईक यांनी केले. यावेळी पाल्याच्या विविध क्षेत्रातील यशाबद्दल नगरपरिषदेमधील २० महिला पालक कर्मचाऱ्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देवून करण्यात आला.
सत्कारमुर्तींतर्फे मुख्याध्यापिका फातिमा बागवान आणि आरती जोशी यांची भाषणे झाली. महिलांचा गौरव हा एक दिवसापुरता न राहता; तो प्रत्येक दिनी झाला पाहिजे, असे मत उपमुख्याधिकारी अरविंद दामले यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.
आभार प्रदर्शन भांडार विभागप्रमुख स्नेहल घाडगे यांनी केले. कीर्ती साळुंखे आणि गीतांजली यादव यांनी सूत्रसंचालन केले. नगरपरिषदेमधील सर्व महिला कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होत्या.