'बिद्री'तील पराभवामुळे आबिटकर अजून चाचपडलेलेच; त्यांना के पीं चा दुसरा धक्का सोसेल काय?- बाळ जाधव

'बिद्री'तील पराभवामुळे आबिटकर अजून चाचपडलेलेच; त्यांना के पीं चा दुसरा धक्का सोसेल काय?- बाळ जाधव

गारगोटी (प्रतिनिधी) : सहा महिन्यांपूर्वी बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभूत झालेले पॅनेलप्रमुख आमदार प्रकाश आबिटकर अजून चाचपडलेल्या स्थितीत असताना माजी आमदार के पी पाटील विधानसभेच्या या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा जोरदार धक्का देणार आहेत. असे धक्क्यावर धक्के त्यांना सोसतील काय? असा प्रश्न फणसवाडीचे लोकनियुक्त सरपंच बाळ जाधव यांनी विचारला.

पिंपळगाव (ता.भुदरगड) येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

 जाधव पुढे म्हणाले,"बिद्री साखर कारखाना ही चार तालुक्यातील ६५ हजार सभासदांची अर्थवाहिनी आहे. त्याचे अर्थकारण बिघडावे यासाठी आबिटकरांनी सत्तेचा दुरुपयोग करीत जंग जंग पछाडले. 'बिद्री'चा सहवीज प्रकल्प व इथेनॉल प्रकल्प हे के पी पाटील यांच्या कल्पकतेतून सभासदांच्या उत्कर्षासाठी उभा राहिल्याचे पाहून जमेल तेवढी अडवणूक अबिटकरांनी केली. बिद्रीचे अर्थकारण बिघडवून के पी पाटलांची प्रतिमा डागाळायची व विधानसभेतील संभाव्य विरोधकाला मैदानात उभे राहण्यापूर्वीच खच्चीकरण करायचे अशी अनैतिक राजनीती आबिटकरांनी वापरली. अशी घाणेरडी कृती करून आपण जणू सभासदांच्या चुलीत पाणी ओततोय याचे भानही त्यांना राहिले नव्हते. परंतु सुज्ञ सभासदांना त्यांची ही खलनायकी वृत्ती आवडली नसल्यामुळे त्यांच्या पॅनेलचा फार मोठ्या फरकाने पराभव झाला. या पराभवातून ते सावरलेले नसतानाच आता या निवडणुकीतही के पी पाटील यांना विजयी करून आबिटकरांना सलग दुसऱ्या पराभवाची धूळ चारूया."

 विश्वनाथ कुंभार म्हणाले,"जसा बिद्रीमध्ये विजयोत्सव साजरा केला तशी संधी विधानसभेमुळे आपल्याला पुन्हा चालून आलेली आहे. उरलेल्या आठवड्यात प्रत्येक नेते आणि कार्यकर्त्याने जागरूक राहून केपींच्या विजयासाठी सर्व शक्ती पणाला लावूया."

यावेळी विलासराव झोरे, सुरेश नाईक,डी एस देसाई,संभाजी पाटील आदींची भाषणे झाली. सभेसाठी दयानंद भोईटे, सचिन घोरपडे, विलासराव झोरे, रमेश पाटील,अभयसिंह यादव रणजीत देसाई आदी उपस्थित होते.

सभेपूर्वी पाल,बारवे, मुरकुटे,केळेवाडी,भेंडी बांबर,दिंडेवाडी, आरळगुंडी,पांगिरे, नागणवाडी, मानवळे आदी गावांचा प्रचार दौरा झाला.

*आबिटकरांची पैसे आणि शपथांची जादू चालणार नाही*

माजी आमदार के पी पाटील म्हणाले,"निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने आबिटकरांचे बगलबच्चे ठेकेदार मतदारसंघात पैशांचे आमिष दाखवीत वाटप करीत असल्याचे व आबिटकर बंधू ठराविक जणांना हेरून शपथा घेत असल्याचे समजले आहे. कोटींच्या आकड्यात विकास कामे केल्याचा कांगावा करणाऱ्या आमदारांना आता पैसे वाटण्याची आणि शपथा घेण्याची वेळ का आली? जनता आता आमच्याबरोबर असल्याने त्यांची ही जादू आता या निवडणुकीत चालणार नाही."