ॲड. विरेंद्र मंडलिक यांच्याकडून चिमगावच्या आंगज परिवाराचे सांत्वन.
मुरगूड प्रतिनिधी : कपकेक खाल्ल्याने विषबाधा झालेल्या चिमगाव ( ता.कागल) येथील रणजित नेताजी आंगज यांच्या चिमुरड्या मुलांच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. समाजातल्या सर्व थरातून आंगज परिवारांचे सांत्वन सुरू आहे.
शिवसेना युवा शाखेचे पश्चिम महाराष्ट्राचे निरीक्षक , सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि मंडलिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी शुक्रवारी सकाळी चिमगाव येथे रणजीत आंगज यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी सुमारे अर्धा तास कुटुंबीयांशी भावनिक पातळीवर संवाद साधत त्यांच्या दुःखाचे सांत्वन केले.यावेळी त्यांच्यासोबत मंडलिक कारखान्याचे माजी संचालक नारायण मुसळे, सरपंच दीपक आंगज ,ग्रामपंचायत सदस्य सागर भोई, साताप्पा कृष्णा आंगज, बाळू राऊ आंगज, यशवंत आंगज , शामराव मोरबाळे, बाजीराव आंगज , विश्वनाथ करडे , आनंदा करडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
चिमगाव येथे मंगळवारी कपकेक खाल्ल्याने विषबाधा झालेल्या श्रीयांश रणजीत आंगज (वय ४) व काव्या रणजीत आंगज (वय ७ ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर या दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूने आंगज कुटूंबावावर मोठा आघात झाला आहे.
दरम्यान मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने श्रीयांश मृतदेह दफण भूमीतून जेसीबीच्या सहाय्याने बुधवारी बाहेर काढला. मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद माने व त्यांच्या पथकाने उत्तरीय तपासणी केली होती.तर अन्न व प्रशासन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या तपासात सुरुवात केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आंगज कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी ॲड. मंडलिक यांनी चिमगाव येथे आंगज कुटुंबियांची भेट दिली.त्यांच्या दुःखात सामील होत आधार व दिलासा दिला. यावेळी त्यांनी आंगज कुटुंबास आवश्यक ती मदत देण्याची ग्वाहीही दिली.