ॲड.वीरेंद्र मंडलिक यांना महायुतीतून विधानसभेची उमेदवारी द्या

ॲड.वीरेंद्र मंडलिक यांना महायुतीतून विधानसभेची उमेदवारी द्या

कागल (प्रतिनिधि) : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ अशी ओळख असणाऱ्या कागल तालुक्यातून यावेळी महायुतीकडून ॲड. वीरेंद्र मंडलिक यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी उत्स्फूर्त मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांची जनसंवाद यात्रा सुरू आहे. या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी श्रीक्षेत्र आदमापूर येथे संत बाळूमामा यांचे दर्शन घेतले. त्यावेळी झालेल्या पदाधिकारी बैठकीत कार्यकर्त्यांनी ही मागणी केली.

दिवंगत लोकनेते सदाशिव मंडलिक यांनी अनेक वर्ष जिल्ह्याच्या राजकारणावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. गावागावात सहकार रुजवण्यासाठी त्यांनी पतसंस्था , सेवा संस्था , दूध संस्था व अन्य संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोठे संघटन केले आहे. ही मंडलिक गटाची ताकद आहे. सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना , जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, तालुक्यातील तिन्ही नद्या बारमाही करण्याची कामगिरी आणि कागल तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी अथक काम केले आहे. त्यामुळे तालुक्यात त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे एक भक्कम जाळे माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या मागे उभे आहे. युवा पिढीचे कर्णधार म्हणून ॲड. वीरेंद्र मंडलिक गटबांधणीसाठी सतत कार्यरत आहेत.

 शिवसेना पक्षाच्या युवा सेनेने नुकतीच त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. युवा वयात ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी जिल्हा परिषद व गोकुळ दूध संघाची निवडणूक लढविली असून त्याचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.मंडलिक युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी तालुकावर युवकांचे भक्कम जाळे उभे केले आहे लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे ते युवा संचालक आहेत तर मुरगुडच्या जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे ते कार्याध्यक्ष आहेत याशिवाय विविध सहकारी संस्था ते पदाधिकारी म्हणून काम करत आहेत.

त्यामुळे ते विधानसभेच्या उमेदवारीसाठी पात्र उमेदवार ठरतात. कागल, गडहिंग्लज व आजरा या तीन तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कागल तालुक्यात सुमारे साडेतीन लाख मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मंडलिक गटाचा तालुक्यातील प्रत्येक गावाशी व कार्यकर्त्यांशी संपर्क आहे. त्या बळावरच ॲड. मंडलिक यांना महायुतीने विधानसभेची उमेदवारी दिल्यास ते महायुतीला विजयापर्यंत नेऊ शकतात.अशी भूमिका शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर मांडली.

यावर आता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे काय भूमिका घेतात याची कार्यकर्त्यांच्यात उत्सुकता आहे.