अपघातात मृत दलित कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना मंत्री हसन मुश्रीफ यांची दोन लाखांची मदत

कागल - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अपघातात मृत झालेल्या कागलमधील दलित कार्यकर्त्याच्या कुटुंबांना दोन लाखांची आर्थिक मदत दिली. मंत्री मुश्रीफ यांचे दातृत्व आणि सामाजिक बांधिलकीमुळे समाज बांधव गहिवरले.
याबाबत अधिक माहिती अशी, कागल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील समीर किरण कांबळे हा २३ वर्षाचा अविवाहित तरुण कार्यकर्ता. त्याच्या पाठीमागे आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. तो १४ एप्रिल रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाहून माणगाववरून कागलकडे परतत होता. राष्ट्रीय महामार्गावर कागल एस. टी. डेपोसमोरच मोटार सायकल घसरल्यामुळे त्याचा अपघात होऊन डोकीला गंभीर मार लागला. शर्तीचे प्रयत्न करूनही तो वाचला नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिवशी सकाळीच अपघाताची दुर्घटना घडली. दरम्यान ; त्याचवेळी मंत्री मुश्रीफ हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये जयंती कार्यक्रमासाठी गेले होते. तिथल्या कार्यकर्ते आणि रहिवाशांनी त्यांना ही गोष्ट सांगितली त्यांनी समीरला तातडीने कोल्हापूरला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात नेण्यासाठी सांगितले. डॉक्टरांची उपलब्धता करीत लागलीच त्याच्यावर शस्त्रक्रिया आणि औषधोपचारही सुरू झाले. परंतु ; चार दिवस शर्तीचे प्रयत्न आणि औषधोपचार करूनही दुखापत गंभीर असल्यामुळे तो वाचला नाही. आज रक्षाविसर्जनानिमित्त त्याच्या घरी जाऊन मंत्री मुश्रीफ यांनी प्रतिमापूजन केले व कांबळे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे आभार मानले. जयंती साधेपणाने करून तो खर्च कांबळे कुटुंबीयांना दिल्याच्या सामाजिक बांधिलकीबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी समितीचे आभार मानले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, रोहन कांबळे, गणेश कांबळे, विवेक लोटे, राहुल कांबळे, बच्चन कांबळे आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.