आता भाजपसोबत चला, भुजबळ समर्थकांचं आवाहन... भुजबळ काय निर्णय घेणार?
नाशिकः नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. छगन भुजबळ हे ओबीसींचे मोठे नेते आहेत, त्यांना मंत्रिमंडळात न घेतल्याने त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. काही समर्थकांनी आता भाजपासोबत चला, असे छगन भुजबळ यांना जाहीरपणे आवाहन केलंय. परंतु यावर छगन भुजबळ यांनी काहीही निर्णय घेतलेला नाही.
"मैं उस पुराने जमाने का सिक्का हु, मुझे फेंक ना देना", अशा प्रकारे शेरोशायरी करत छगन भुजबळांनी समता परिषदेच्या मेळाव्यात 40 मिनिटे धडाकेबाज भाषण केलंय, यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना लक्ष केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचा माझा मंत्रिमंडळात समावेश असावा, असा आग्रह होता. मात्र आमच्या नेत्याने ऐकलं नाही, असं त्यांनी म्हटलंय. या बैठकीला राज्याच्या विविध भागातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी आले होते. यावेळी काही समर्थकांनी आता भाजपासोबत चला, असे जाहीरपणे आवाहन केलंय, तर काहींनी नवीन पक्ष काढण्याच्या मनोदय व्यक्त केलाय, मात्र तूर्तास सध्या कुठेही जायचे नाही. राज्यभरातील समता परिषदेचे पदाधिकारी आणि नेत्यांशी बोलून पुढील राजकीय वाटचाल ठरवणार असल्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिलेत.आता यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार का? ते काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.