एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ; लवकरच नवा मुख्यमंत्री मिळणार

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांना सादर केला आहे. राज्यपालांकडून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केले. एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्या नंतर सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून आज सायंकाळपर्यंत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्व घडामोडींवर बोलताना शिंदे शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा सादर केला आहे राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांकडून त्यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता महायुतीचे नेते चर्चा करून दिल्लीला जातील आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्रीपदी फडणवीसांचीच वर्णी ?
एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे अशी शिंदे शिवसेनेच्या आमदारांची इच्छा आहे. आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला. यांनतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल असं म्हटलं आहे. अमित शहा यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.आज सायंकाळपर्यंत याबाबत निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.