एसटी स्टँड-राजारामपुरीला जोडणारा लोखंडी पादचारी उड्डाण पुल करणार कधी? : प्रतिज्ञा उत्तुरे

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रेल्वे स्टेशन असल्याने त्याठिकाणी शहराचे दक्षिण-उत्तर असे दोन भाग पडले आहेत. परिख पुलाखालून जीव धोक्यात घालून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. यात महाविद्यालयीन युवक-युवतीसह आबाल वृध्दांचा समावेश आहे. त्यामुळे एसटी स्टँड ते राजारामपुरीला जोडणारा लोखंडी पादचारी उड्डाण पूलाला सुमारे ४ कोटींचा निधी मंजूर झाला. त्याचा निधीही महापालिकेकडे वर्ग करण्यात आला. ठेकेदाराला वर्कऑर्डर देऊन वर्ष उलटले तरीही अद्याप त्याचे काम सुरू झालेले नाही. परिणामी पादचारी उड्डाण पूल करणार तर कधी? लवकरात लवकर काम करून उड्डाण पूल पूर्ण करावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.
एसटी स्टँड ते राजारामपुरी या मार्गावर पायी ये-जा करण्यासाठी पर्याय नाही. त्याचा विचार करून पादचारी उड्डाण पूलासाठी (फूट ओव्हर ब्रिज) ३ कोटी ८२ लाख निधी मंजूर झाला. तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ९ मार्च २०२४ रोजी थाटामाटात कामाचे भुमिपुजनही झाले. त्याला वर्ष उलटले तरीही अद्याप कामाला सुरूवात झालेली नाही.
एसटी स्टँड ते राजारामपुरीकडे दररोज सुमारे २० ते २५ हजार नागरिक परिख पुलाखालूनच ये-जा करत आहेत. उड्डाण पुलासाठी निधी मिळाला. रेल्वे विभागानेही मंजुरी दिली. ५४ फूट लांबीचा आणि सुमारे साडेतीन फूट रूंदीचा हा पादचारी उड्डाण पूल आहे. त्याची उंची सुमारे पावणेसहा मीटर असणार आहे. काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार कंपनीला सहा महिन्यांची मुदत होती. परंतू अद्याप कामच सुरू झालेले नाही, त्यामुळे संपण्याचा प्रश्नच नाही, असेही प्रतिज्ञा उत्तुरे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.