कागलमध्ये महिलांनी घेतला फन स्ट्रीटचा आनंद

कागलमध्ये महिलांनी घेतला फन स्ट्रीटचा आनंद

कागल प्रतिनिधी :  येथे रविवारी (ता.९)राजमाता जिजाऊ महिला समितीच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित फन स्ट्रीट या कार्यक्रमाचा महिलांनी आनंद घेतला.राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन, राजमाता जिजाऊ महिला समिती यांच्या वतीने 'लोकरंग'अंतर्गत हा कार्यक्रम महिलांच्या उत्सफूर्त सहभागात उत्साहात संपन्न झाला. 

शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या व राजे बँकेच्या अध्यक्षा  नवोदिता घाटगे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले.या उभयंतांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

निपाणी वेशीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महिलांनी सामाजिक संदेश देणारी बाईक रॅली काढली. यामध्ये नवोदिता घाटगेही सहभागी झाल्या.खर्डेकर चौकात श्रीराम मंदिरसमोर लाठीकाठी, तलवारबाजी, स्टॅण्ड अप कॉमेडी,पारंपरिक वेशभूषा ,रस्त्यावर रांगोळी स्पर्धा, संगीत बँड ,गणेश वंदना नृत्य,रस्सीखेच, अशा विविध उपक्रमात महिलांसह लहान मुलांनी सहभाग घेतला.

'छावा'चा थरार महिलांनी अनुभवला चित्रपटगृहात

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य व बलिदानावर आधारित छावा चित्रपट सद्या सर्वत्र गाजत आहे.कोल्हापूर शहरातील अद्ययावत चित्रपटगृहात खास आरक्षित खेळातून कागल व परिसरातील सातशेहून अधिक महिलांना या चित्रपटाचा थरार अनुभवता आला.