कागलमध्ये सावनी शेंडे यांच्या अभंगरंगच्या भक्तीरसात रसिक चिंब

कागलमध्ये सावनी शेंडे यांच्या अभंगरंगच्या भक्तीरसात रसिक चिंब

कागल प्रतिनिधी: कागलमध्ये आयोजित केलेल्या सुप्रसिद्ध भजनी गायिका विदुषी सावनी शेंडे यांच्या अभंगरंग कार्यक्रमाच्या भक्तीरसात रसिक अक्षरशः चिंब झाले. त्यांच्या शास्त्रीय गायनाला रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमासाठी रसिक श्रोत्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने गर्दीचा उच्चांक गाठला.   

   

           

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा वास्तुशांती सोहळा व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने गैबी चौकात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

              

 शेंडे यांनी 'जय जय राम कृष्ण हरी' या पंचपदीने आणि प्रभू श्रीरामांच्या बंदीशीने "अभंगरंग" या शास्त्रीय संगीत भजनी कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमात त्यांनी रामकली रागासह समर्थ रामदास यांची रचना असलेले 'राम राम घ्या- राम जीविचा विसावा', तुलसीदास नाटकातील पहाडी रागातील 'मन हो राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले', स्वामी स्वरूपानंद महाराज यांची रचना असलेले, 'राम नाम येता कानी -होय पातकांची धुनी', संत मीराबाई यांची रचना असलेले, 'पायोजी मैंने राम रतन धन पायो', राम का गुणगान करीये- राम प्रभू की भद्रता का और सभ्यता का ध्यान धरीये', 'माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी'.... या अभंगांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. तसेच शेंडे यांनी भैरवी रागामध्ये 'राम कृष्ण हरी' या अभंगांने अभंगरंग कार्यक्रमाची सांगता केली.

                

आनंद आणि परमानंद.....!

निवेदक संजय भुजबळ म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे अशा सांस्कृतिक, धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात हा खरा आनंद आहे. अशा गोष्टींमध्ये समाज त्यांच्या सोबत आहे हा खरा परमानंद आहे.

                 

अभंगरंग कार्यक्रमात सहभागी झालेले सहकलाकार असे, सहगायन- प्रीती जोशी व श्रुती वैद्य, हार्मोनियम- राहुल गोळे, तबला साथ- रोहित मुजुमदार, पखवाज साथ- मनोज भांडवलकर, टाळवादन- आनंद टाकळकर, बासरी साथ - अमित काकडे, निवेदन - संजय भुजबळ, सिंथेसायझर मिहीर भडकमकर. 

              

मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते शेंडे यांच्यासह सर्व सह कलाकारांचे सत्कार करण्यात आले.