काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करावे: ओवैसी

परभणी : परभणीतील ईदगाह मैदानावर वक्फ कायद्याविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आयोजित केलेल्या बैठकीत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत सांगितले की, पाकिस्तानने वारंवार हल्ले करून अनेक निष्पापांचा बळी घेतला आहे. दहशतवादी महिलांना व मुलांना धर्म विचारून गोळ्या घालतात, आणि इस्लाममध्ये निष्पापांची हत्या मोठा गुन्हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ओवैसींनी पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याची गरजही अधोरेखित केली. "पाकिस्तान आपल्याशी स्पर्धा करू शकत नाही," असे सांगून त्यांनी भारतातील नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला.
वक्फ कायद्याविरोधात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. वक्फची मालमत्ता अल्लाहची आहे, सरकारने ती हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी आवाहन केले की, वक्फसाठी सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर शेतकरी आंदोलनासारखा दबाव टाकावा.
काश्मीरविषयी बोलताना ओवैसी म्हणाले की, काश्मीर आणि काश्मीरी लोक भारताचा भाग आहेत आणि त्यांच्यावर संशय घेणे अयोग्य आहे. त्यांनी केंद्र सरकारला योग्य कारवाई करण्याचे आवाहन करत सांगितले की, भारत कोणत्याही एका पक्षाचा नाही, तर १३५ कोटी भारतीयांचा आहे.