कोल्हापुरातील ६०० गुंतवणूकदारांना ३० कोटींचा चुना

कोल्हापुरातील ६०० गुंतवणूकदारांना ३० कोटींचा चुना

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी

कोल्हापुरात एक लाख रुपयांना दरमहा आठ हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवून वेल्थ शेअर ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून 600 गुंतवणूकदारांची सुमारे 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी यापूर्वी तीन आरोपींना अटक केले होते. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी आणखी एकाला अटक केली. विजय जाधव असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. यामागे शहरातील एका गुंडाचा हात असल्याची माहिती समोर आली आहे.

या गुंडाच्या मदतीने कदमवाडी परिसरातील एका शाळेतील लिपिकाने कोट्यवधी रुपये वेल्थ शेअरमध्ये गुंतवले आहेत. हे दोघेही आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. नेहरूनगर येथील संग्राम नाईक याने त्याच्या साथीदारांसह सुरू केलेल्या वेल्थ शेअर कंपनीद्वारे सुमारे ६०० गुंतवणूकदारांची ३० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी विजय जाधव या चौथ्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय. त्याला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयाने त्याला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.