कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी कावळेसाद दरीत कोसळला

कोल्हापूर (प्रतिनिधी) - वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे गेलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याचा पाय घसरून तो थेट ३०० फूट खोल कावळेसाद दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
राजेंद्र बाळासो सनगर (रा. चिले कॉलनी, मूळ गाव – माले, ता. पन्हाळा) हे आपल्या १४ सहकाऱ्यांसोबत आंबोली येथे वर्षा सहलीसाठी गेले होते. कावळेसाद पॉईंटजवळ फोटोसेशनदरम्यान ते दरीच्या काठावर उभे असताना अचानक पाय घसरून दरीत कोसळले.
सरपंच सागर ढोकरे यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल मनीष शिंदे व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी अंधार आणि दाट धुके असल्यामुळे शोध मोहीम राबवणे शक्य झाले नाही. त्यामुळे राजेंद्र सनगर यांचा शोध शनिवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.