महात्मा बसवेश्वरांचे विचार कालसुसंगत - आमदार सतेज पाटील

महात्मा बसवेश्वरांचे विचार कालसुसंगत - आमदार सतेज पाटील

कोल्हापूर -  महात्मा बसवेश्वरांचे विचार आजही कालसुसंगत असून ते पुढे घेवून जाण्याचे कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. महात्मा बसवेश्वर जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासनाच्या नूतनीकृत कार्यालयाचे लोकार्पण व अध्यासनास पाच लक्ष रूपयांच्या ग्रंथांचे हस्तांतरण समारंभ प्रसंगी आमदार पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते. प्र - कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.  

आमदार पाटील पुढे म्हणाले, जातीभेद दूर ठेवून सर्वांना सोबत घेवून पुढे जाण्याचे मोठे कार्य महात्मा बसवण्णांंनी 12 व्या शतकामध्ये सुरू केले. हेे विचार आजच्या काळामध्ये खूप उपयुक्त आहेत. त्यांच्या विचारांचा वसा पुढे घेवून जाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शरण साहित्याचे कंटेंट ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याचेबरोबर, ज्या महापुरूषांचे इतिहास आपण सांगतो त्यांचे विचार पुढे घेवून जातो त्यांच्या विचारांचा इतिहास ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. तंत्रज्ञानाचा उपयोग उद्याच्या भविष्यकाळात आपला खरा इतिहास बदलण्यासाठी होवू नये. तो तसाच टिकून रहावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्र शासनाने महापुरूषांचे अध्यासन होण्याच्या दृष्टीने योग्य ते धोरण स्विकारून निधी देण्यास सुरू केले आहे. ज्या भूमिला इतिहास असतो ती भूमी भूगोल घडवते. आपल्या भूमीला मोठा इतिहास आहे.

आमदार जयंत आसगांवकर म्हणाले, समाजामध्ये समता, बंधुता पसरविण्याची भूमिका महात्मा बसवेश्वरांनी घेतली होती, हे मार्गदर्शक विचार शरण साहित्याच्या माध्यमातून आजच्या तरूण पिढी पुढे आले पाहिजे. शिवाजी विद्यापीठातील हे शरण साहित्य अध्यासन राज्यातील पहिले अध्यासन केंद्र आहे. शरण साहित्याच्या प्रचार आणि प्रसाराबरोबरच हा ठेवा जतन करणे आणि समाजापुढे आणणे गरजेचे आहे.  

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांच्या विचार कार्यामध्ये श्रमाधिष्ठित जीवन, स्वयंपूर्ण व स्वावलंबी समाज आणि स्त्री-पुरूष समानता हे सूत्र आढळते. ऑनलाईन कन्टेंटच्या माध्यमातून महामानवांचे कार्य पुढे घेवून जाण्याचे काम विद्यापीठामध्ये सुरू झालेले आहे.  

याप्रसंगी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य सुर्यकांत पाटील बुध्दीहाळकर, अधिसभा सदस्य ॲड.अभिषेक मिठारी यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.रघुनाथ धमकले, डॉ.शरद बनसोडे, डॉ.व्ही.एम.पाटील, डॉ.विजय ककडे, यश आंबोळी, सरलाताई पाटील, अक्षर दालनचे आलोक जोशी यांचेसह शिक्षक, अधिविभागप्रमुख, अधिकार मंडळाचे सदस्य, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.