कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध -पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर शहरातील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण व इतर कामांसाठी 9 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0' अभियानाचा शुभारंभ,
शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना
कोल्हापूर जिल्ह्यातील सात ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
आपला दवाखान्याचे डिजिटल अनावरण
जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमधील पायाभूत सोयीसुविधांसाठी 120 कोटीचा निधी
पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण छत्रपती शाहू स्टेडियम येथे करण्यात आले
कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात आहे. राज्यात व देशात कोल्हापूर जिल्हा विकासात अग्रेसर राहावा यासाठी सर्वांच्या सहकार्यातून एकत्रितपणे प्रयत्न केले जात असून आपला जिल्हा विकासात कायमस्वरुपी अग्रेसर राहावा, यासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते झाला, याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर तसेच स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरातील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण व इतर कामांसाठी 9 कोटी 40 लाखाचा निधी मंजूर केला आहे. समाधी स्थळाची जागा सामाजिक न्याय विभागाच्या नावावर असण्याबाबतची अट ही शिथिल करण्यात आली असल्याने समाधी स्थळाच्या सुशोभीकरण चा प्रश्न मार्गी लागला असून हे काम लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर सह संपूर्ण देशात सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या प्रभावशाली व्यक्तिमध्ये शाहू महाराजांचा उल्लेख करावाच लागतो. महाराजांच्या योगदानातून आपली जडण घडण झाली. मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व दिनांक 6 मे ते 14 मे 2023 या कालावधीत शाहू मिल येथे होत आहे. या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून छत्रपती शाहू महाराजांच्या विचार व कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न करूया आणि 6 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता आपण सर्व जण जिथे आहेत तिथे स्तब्ध उभे राहून आपल्या लोकराजाला अभिवादन करुया. या कृतज्ञता पर्वात सर्व शाहूप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. केसरकर यांनी केले.
राज्य शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील सात ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे डिजिटल अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज होत आहे. यामध्ये मोफत तपासणी, मोफत औषध उपचार व मोफत औषधांचा समावेश आहे. गोरगरीब मजूर कष्टकरी लोकांसाठी बाह्यरुग्ण विभागाची वेळ दुपारी 2 ते रात्री 10 अशी ठेवण्यात आली आहे, असे सांगून श्री. केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0' या अभियानाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा वापरुन 7 हजार मेगावॅट वीज निर्मिती करणे आणि सन 2025 पर्यंत 30 टक्के कृषी फीडर्स सौर ऊर्जेवर चालविणे असे 'मिशन 2025' या अभियानाच्या माध्यमातून निश्चित केले आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेत सहभाग घेण्याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे.
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करून देणे व अनाधिकृत रेती उत्खननास आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणास राज्य मंत्रिमंडळाची ही मान्यता मिळालेली आहे. नव्या रेती धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास 600 रुपये वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. राज्यात 1 मे 2023 पासून या धोरणानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशा काही जिल्ह्यात 600 रुपये दराने वाळू उपलब्ध होईल. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात ही या नवीन धोणानुसार विहित प्रक्रिया अवलंबून वाळू उपलब्ध करून देण्याचे नियोजित असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी दिली.
राज्यातील सर्वसामान्य लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण विभागाकडून दिवाळी, गुढीपाडवा, रमजान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सर्व सण उत्सवाच्या काळात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. त्याची आपल्या जिल्ह्यातही तत्परतेने अंमलबजावणी झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसाधारण योजना सन 2022-23 अंतर्गत 411 कोटीचा निधी विविध विकासाच्या कामावर खर्च करुन त्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत असून या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविला जात आहे. तर सन 2023-24 अंतर्गत 480 कोटीचा विकास निधी मंजूर
असून या अंतर्गत विविध विकास कामे केली जाणार असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले.
राज्य शासनाकडून जिल्ह्यातील शाहूवाडी येथे नव्या औद्योगिक वसाहतीला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. तर मजले ता. हातकणंगले येथे ड्रायपोर्ट होणार आहे. जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमधील पायाभूत सोयी सुविधांसाठी 120 कोटीचा निधीही उद्योग विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी नाबार्डच्या पुढाकाराने भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथे मध उद्योग, चंदगड तालुक्यातील बसरगे येथे रेशीम उद्योग तर हातकणंगले तालुक्यात शेळीपालनासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येत आहे. यासाठी नाबार्ड कडून 30 लाखाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती श्री केसरकर यांनी दिली.
कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची 93 टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे अधिक गतीने सुरु असून 31 मे 2023 अखेर ही सर्व कामे पूर्ण करुन कोल्हापूर शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिली. प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत 2021-22 या वर्षामध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्य गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागात इयत्ता पाचवीचे 34 तर इयत्ता आठवीचे 42 विद्यार्थी गुणवत्ताधारक झाले आहेत,असे त्यांनी सांगितले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून क्षकिरणशास्त्र विभागामध्ये अत्यंत आधुनिक अशी डी. आर. सिस्टीम प्राप्त झाली आहे. या सुविधेमुळे कॅसेट शिवाय एक्सरे काढता येतो, आजाराचे अचूक निदान करण्यास मदत होते. दिवसाला सर्वसाधारण 500 एक्सरे काढता येतात. तसेच अत्यावस्थ असलेल्या रुग्णाला स्ट्रेचरवरुन न हलवता एक्स-रे काढता येतो. या सुविधेमुळे रुग्णांना अधिक गतीने आरोग्य सुविधा देण्यात येत असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी दिली. तसेच जिल्ह्यात राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध योजना व प्रशासनाकडून होत असलेल्या अंमलबजावणी बाबत विविध विभागांची माहिती ही त्यांनी दिली.
प्रारंभी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी परेड कमांडर सोबत परेडचे निरीक्षण केले.परेडचे पथसंचलन झाले. त्यानंतर पालकमंत्री महोदयांच्या हस्ते विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, वस्तू व सेवा कर विभाग, राज्य उत्पादनशुल्क, संचालक भूमी अभिलेख पुणे, परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई या विविध विभागात नियुक्तीचे आदेश आजच्या महाराष्ट्र दिनी पालकमंत्री केसरकर यांच्याहस्ते देण्यात आले. त्यानंतर कोल्हापूर पोलीस दलातील 13 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह 2022 साठी प्रदान करण्यात आला, त्याबद्दल श्री. केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आदर्श तलाठी पुरस्कार, समाज कल्याण अंतर्गत स्वाधार, महाज्योती, स्टॅण्ड अप, मिनी ट्रॅक्टर या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात. समाज कल्याण च्या यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशनही पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते झाले. महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त आयोजित स्पर्धेतील विद्यार्थी यांचा सन्मान, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाचे महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या पुरस्काराचे वितरण ही करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, मान्यवर व्यक्ती, नागरिक, विद्यार्थी, पालक व पत्रकार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.