कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी 29 कोटींचा निधी मंजूर- अमल महाडिक

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी 29 कोटींचा निधी मंजूर- अमल महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी):  नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी तब्बल 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आपण केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला असल्याचे माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितले. 

 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली होती. या रस्त्यांच्या डांबरीकरण तसेच काँक्रिटीकरणासाठी भरीव निधी मिळावा अशी मागणी महाडिक यांनी केली होती. या मागणीची दखल घेत मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी निधी देण्यात आला आहे. 

यामध्ये प्रामुख्याने शहराबाहेरून जाणाऱ्या रिंग रोडचा समावेश आहे. कळंबा ते फुलेवाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न विचारला जात होता. वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होत होती. या रस्त्यासाठी तब्बल सात कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून जोड रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण विविध पूलांची उभारणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शाहू टोलनाक्यापासून बालिंगा शिंगणापूर ते चिखलीपर्यंतच्या रस्त्यासाठी हा निधी खर्च होणार आहे. त्याचबरोबर गांधीनगर वळीवडे चिंचवाड मुडशिंगी चव्हाणवाडी ते तामगाव सांगवडे रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारीकरणासाठीही तीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 

राजेंद्र नगर एसएससी बोर्ड रस्त्यासाठी साडेबारा कोटींचा निधी प्राप्त झाला असून या निधीतून रस्त्याच्या रुंदीकरणासह काँक्रिटीकरण केले जाणार आहे. या प्रमुख रस्त्यांसह दक्षिण मतदार संघातील गावागावांना जोडणारे रस्ते तसेच गावांतर्गत रस्ते डांबरीकरण रुंदीकरण केले जाणार आहेत रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यास यामुळे मदत होणार आहे. या सर्व रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होईल असा विश्वास माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.