"खुद से जीत" अभियान यशस्वी करा - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

"खुद से जीत" अभियान यशस्वी करा - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) - सामाजिक बांधिलकीतून "खुद से जीत" हे अभियान हाती घेतले आहे. अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते बारावीच्या जिल्ह्यातील साडेसहा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांच्या मोफत डोळे तपासणीसह मोफत चष्मे वाटप होणार आहे. तसेच, विद्यार्थिनी व अविवाहित तरुणींना गर्भाशयाच्या कॅन्सरमुक्तीचे लसीकरणही मोफत होणार आहे. "खुद से जीत" हे अभियान यशस्वी करा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

            

"खुद से जीत.....!" या अभियानांतर्गत नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने कोल्हापूर जिल्हाभर गर्भाशय कॅन्सरमुक्ती लसीकरण व पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप उपक्रमाचा शुभारंभ सौ. सरलादेवी माने हायस्कूलमध्ये झाला.

मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये यासाठी एचपीव्ही लसीकरण महत्वाचे आहे.  ही लस दिल्यानंतर गर्भाशयाचा मुखाचा कोणालाही कॅन्सर झालेला नाही.  जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक मुलींचे लसीकरण करायचे आहे. हे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करूया. स्तनाच्या कॅन्सरवर योग्यवेळी उपचार घेतले तर कॅन्सर बरा होऊ शकतो. येत्या आठ दिवसांत कागल तालुक्यातील ५० हजार विद्यार्थ्यांची डोळे तपासणी करून गरजेनुसार मोफत चष्मे देणार आहोत. त्यानंतर गडहिंग्लज, उत्तुर विभागातही हा उपक्रम राबवणार असून जिल्ह्यात सर्वत्र उपक्रम राबवणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, अशा समाजपयोगी कल्पना मंत्री हसन मुश्रीफ यांनाच सूचतात.  कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख मुलींना कॅन्सर होऊ नये म्हणून लसीकरणाचा उपक्रम राबवला. गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे काम मंत्री मुश्रीफ करत आहेत. मंत्री मुश्रीफ यांना जीवनदाता म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. 

यावेळी नेत्ररोगतज्ञ डॉ . सतीश देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. फारूक देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले तर आभार प्रा. एस. एस. संकपाळ यांनी मानले.                         

यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, सी. पी. आर. चे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध पिंपळे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक रामचंद्र  सातवेकर, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी, सुनील माने, प्रवीण भोसले,  अस्लम मुजावर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.