छ.शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसह तमाम जनतेचा पालकमंत्र्यांकडून अपमान- समरजितसिंह घाटगे

छ.शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसह तमाम जनतेचा पालकमंत्र्यांकडून अपमान- समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल,गडहिंग्लज-उत्तूर ही छत्रपती शाहू महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. छत्रपती शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वास पुढे आणून पुरोगामी विचाराचा पुरस्कार केला. अशा कागलचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब वारंवार खालच्या दर्जाची, अशोभनीय वक्तव्य करीत आहेत. यातून ते छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांसह कागल गडहिंग्लज उत्तूरमधील संपूर्ण नागरिकांचा अपमान करत आहेत.त्यांच्या या असंविधानिक भाषेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. त्याबद्दल त्यांनी  माझी नव्हे कागल गडहिंग्लज  उत्तुरकारांची माफी मागावी. अशी मागणी शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजे समरजितसिंह  घाटगे  यांनी केली.

  गडहिंग्लज  येथे झालेल्या एका विकास कामाच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात पालकमंत्री मुश्रीफ  यांनी राजे समरर्जीतसिंह घाटगे यांच्या बाबतीत भिकारी हा शब्द वापरला. त्यानंतर  याबाबत सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांनी विचारले असता प्रत्युत्तरा दाखल ते बोलत होते.

 घाटगे पुढे म्हणाले, मुश्रीफ साहेब यांच्या सारख्या जबाबदार लोकप्रतिनिधी कडून पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने काय आदर्श घ्यायचा? शाहूंच्या कागलची ही बदनामी नव्हे का?कागल, गडहिंग्लज उत्तूर  विभागामध्ये दिवंगत विक्रमसिंहराजे  घाटगे, सदाशिवराव मंडलिक, श्रीपतराव शिंदे,बाबासाहेब कुपेकर,आप्पासाहेब नलवडे यांच्यामध्ये टोकाचे मतभेद झाले. पण त्यांनी कधी  अशी पातळी सोडली नाही. वारंवार होणाऱ्या असंविधानिक भाषेच्या वापरामुळे छत्रपती शाहू महाराजांच्या कागलची बदनामी होत आहे असे त्यांना वाटत नाही का? याच राजघराण्याने त्यांना राजकारणात आणले हे ते विसरले का? मला तर वाटते अशा प्रकारे बदनामीचा त्यांनी ठेकाच घेतला आहे. कारण त्यांची पार्टी आता चार कॉन्ट्रॅक्टरांची पार्टी झाली आहे. माझ्याकडून सुद्धा त्यांच्या प्रमाणे अशाच असंविधानिक शब्दांचा वापर व्हावा अशी त्यांची अपेक्षा असेल मात्र मी माझी पातळी सोडणार नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बदल्यांच्या दलालीच्या आरोपाबाबत बोलताना घाटगे  म्हणाले देवेंद्र फडणवीस त्यांच्या कार्यक्रमाला आलेच नाहीत.ते जेव्हा केव्हा येतील तेव्हा याबाबतीत त्यांना आपण जरूर विचारा.

 निवडणूक अजून जाहीर झालेली नाही. त्याआधीच त्यांची ही अवस्था झाली आहे. कारण त्यांच्या लक्षात आले हे की आता ही निवडणूक हातातून निसटली आहे. कागल गडहिंग्लज  उत्तुरच्या जनतेने ती हातात घेतल्यामुळे हसन मुश्रीफ विरुद्ध समरजितसिंह घाटगे  अशी न राहता हसन मुश्रीफ विरुद्ध कागल गडहिंग्लज उत्तूर  मधील स्वाभिमानी जनता असेच तिचे स्वरूप झाले आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या परिवर्तनाची सुरुवात कागल मधून होईल असेही त्यांनी स्पष्ट केले

 पाठीमागच्या दाराने पळून जाऊन त्यांनी स्वतःच आरोपी असलेचे सिद्ध केले

मला तुरुंगात घालून आमदार होण्याची श्री घाटगे स्वप्न पाहत आहेत या वक्तव्याबाबत  छेडले असता,श्री घाटगे म्हणाले त्यांच्यावर सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या शेअर्सचे 40 कोटी रुपये त्यांनी खाल्ल्याचा आरोप मी केला आहे. त्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्याआधीच ते शरद पवार साहेबांना सोडून दुसऱ्या बाजूला गेले. न्यायप्रविष्ठ बाब असताना तुरुंगवास वगैरे या पुढच्या गोष्टी आहेत. पुढे काय होईल हे माहित नाही. मात्र त्यांनी पाठीमागील दाराने पळून जाऊन आरोपी असल्याचे  स्वतःसिद्ध केले आहे. मी तुरंगात घालण्याचा प्रश्न येतोच कुठे?