ठाकरे बंधूंमध्ये युती अन् सर्वेनुसार 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता..?

मुंबई - मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. गेल्या सव्वा दोन दशकांहून अधिक काळ मुंबई महापालिकेवर वर्चस्व गाजवणाऱ्या शिवसेनेपुढे यंदा मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत झालेल्या फूटीनंतर पक्ष दोन गटांमध्ये विभागला गेला. एकीकडे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आणि दुसरीकडे शिंदे गट. मुंबई महापालिकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा गट) कडून मुंबईत एक सर्वेक्षण करण्यात आलं असून ठाकरे बंधूंनी (उद्धव आणि राज) एकत्र निवडणूक लढवल्यास त्यांना १०० हून अधिक जागांवर विजय मिळू शकतो.
मुंबई महापालिका ही आशियातील सर्वांत श्रीमंत महापालिका मानली जाते. त्यामुळेच येथील सत्ता कोणाच्या हातात जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याचा विचार सुरु केला आहे. मात्र अद्याप राज ठाकरे यांनी या प्रस्तावाला प्रतिसाद दिलेला नाही.
२०१७ च्या निवडणुकीत एकसंघ शिवसेनेनं ८४ जागा, तर भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. मनसेला केवळ ७ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या शिवसेनेतून निम्म्याहून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही गटांची ताकद कमी झाली आहे.
सर्वेक्षणानुसार, जर ठाकरे बंधूंमध्ये युती झाली, तर मनसेला २५ पेक्षा अधिक जागा मिळू शकतात. २०१२ मध्ये मनसेने २८ जागा जिंकत आपली सर्वोत्तम कामगिरी केली होती. यंदा ही संधी पुन्हा मिळू शकते, असं चित्र आहे.
युती न झाल्यास दोघांनाही तोटा?
ठाकरे बंधूंमध्ये युती न झाल्यास दोघांनाही तोटा होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार, अशा परिस्थितीत राज ठाकरे यांच्या मनसेला केवळ १० जागा मिळू शकतील, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ६५ जागांवर समाधान मानावं लागू शकतं.